सोलापूर : सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर कंटेनर आणि दुचाकीची धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीवरील विनीत श्रीनिवास पोरंडला (वय २६ वर्ष, रा. भवानी पेठ, सोलापूर) याचा जागीच मृत्यू झाला. तसंच पवन मधुकर नामपल्ली (वय २५ वर्ष, रा. भवानी पेठ) हा गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर स्थानिकांनी दोघांनाही शासकीय रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र विनीत पोरंडला याला डॉक्टरांनी मृत घोषित केले, तर पवन हा तरुण गंभीर जखमी असून त्याला अतिदक्षता विभागात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे.

विनीत हा नुकताच सोलापुरातील एका खासगी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये इलेक्ट्रॉनिक अँड टेलीकम्युनिकेशनमध्ये अंतिम वर्षाची परीक्षा पास झाला होता. तर जखमी पवन नामपल्ली हा औषध कंपनीत मेडिकल रिप्रेजेंटिव्ह म्हणून काम करत आहे. मृत विनीतची आई कलावती पोरंडला यांना अपघाताची माहिती मिळताच त्या धावत शासकीय रुग्णालयात आल्या. मात्र इंजिनिअर मुलाचा मृतदेह पाहून आईने हंबरडा फोडला. विनीतच्या आईला रडताना पाहून शासकीय रुग्णालयातील इतर नागरिकांनाही अश्रू अनावर झाले होते.

कटुंबातील चौघांचा अपघात, अंत्यसंस्कारावेळी अपघातातून वाचलेल्या अश्विनच्या संवादाने उपस्थितांना अश्रू अनावर

अक्कलकोटच्या दिशेने जाताना कंटेनर आडवा आला

विनीत पोरंडला व पवन नामपल्ली हे दोघे सोलापूरकडून अक्कलकोटकडे दुचाकी (एमएच १३-ईबी-०२६८)वरून गुरुवारी २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास जात होते. अक्कलकोट रोडवरील टाटा शोरूमजवळ कंटेनर (एम एच ४५ ए एफ ६१९१) हा आडवा आला. वेग जास्त असल्याने दुचाकी नियंत्रणात आली नाही आणि दोन्ही तरुण कंटेनरखाली घसरत गेले. अपघात इतका भीषण होता की, विनीत पोरंडला याच्या डोक्याला जबर मार लागून मेंदू रस्त्यावर पडला होता.

मुलाचा मृतदेह पाहून आईचा आक्रोश

कलावती पोरंडला या एकल महिला आहेत. कलावती यांना दोन मुलं होती. पतीच्या निधनानंतर घराची संपूर्ण जबाबदारी कलावती यांच्यावर आली आहे. कलावती या सोलापुरातील एका खाजगी रुग्णालयात काम करतात. मोठा मुलगा दिव्यांग आहे, तर लहान मुलगा विनीत पोरंडला हा अभ्यासात हुशार असल्याने कलावती यांनी खूप मेहनतीने विनीतला इंजिनिअर बनवले होते. मात्र इलेक्ट्रॉनिक अँड टेलीकम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण होताच भीषण अपघातात विनीतचा गुरुवारी २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी मृत्यू झाला आहे. मुलगा इंजिनिअर झाला, आपल्या कष्टाचे चीज झाले, असं समाधान बाळगलेल्या कलावती यांच्या नशिबी पुन्हा दुःखाचा डोंगर आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here