सातारा : भाजपचे राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचा आज (२४ फेब्रुवारी) ५७ वा वाढदिवस. संपूर्ण महाराष्ट्रभर उदयनराजे यांचा मोठा चाहता वर्ग आहे. कधी बुलेट राईड, तर कधी जिममध्ये व्यायाम करत आपल्या अनोख्या स्टाईलने ते चाहत्यांना खुश करताना दिसतात. त्यांची कॉलर उडवण्याची शैली तर पाठिराख्यांमध्ये प्रसिद्ध आहेच, शिवाय त्यांनी ‘पुष्पा’ सिनेमाची केलेली स्टाईलही अनेकांना आवडते. चाहते आणि समर्थकांचा आग्रह उदयनराजे फारसे मोडताना दिसत नाहीत. यावेळी गाणं गाण्याबाबत चाहत्यांनी केलेला हट्टही उदयनराजेंनी पुरवला.

खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त साताऱ्यातील गांधी मैदानावर सुप्रसिद्ध गायक रोहित राऊत आणि गायिका जुईली जोगळेकर या म्युझिकल कपलच्या ‘जल्लोष गाण्यांचा’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी रोहित राऊतच्या आग्रहानंतर उदयनराजेंचा गाता गळा अनुभवण्याची संधी चाहत्यांना मिळाली.

चाहत्यांचा आग्रह उदयनराजे कधी मोडत नाहीत. त्यामुळे याआधीही त्यांनी अनेकदा सूर छेडल्याचं पाहिलं आहे. उदयनराजेंच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमातही चाहत्यांनी त्यांना गाणं गाण्यास सांगितलं. त्यानंतर गायक रोहित राऊत स्टेजवरुन खाली येत उदयनराजेंच्या जवळ खुर्चीवर बसला आणि त्यानेही दोन शब्द गाण्याचा आग्रह धरला. यावेळी उदयनराजेंनी आधी आढेवेढे घेतले. मात्र नंतर त्यांनी गायलेलं “तेरे बिना… जिया जाये ना” हे गाणं सातारकरांना फिदा करून गेलं.

चाहत्यांच्या प्रचंड उत्साहात गायलेल्या या गाण्यानंतर जल्लोष गाण्यांचा कार्यक्रमाचा माहोलच बदलून गेल्याचं बोललं जात होतं. उदयनराजेंना संगीत क्षेत्राचीही आवड आहे. त्यांच्याकडे जुन्या गाण्यांचे अल्बम असून निवांतक्षणी ते त्या गाण्यांचा आस्वाद घेत असतात. ‘तेरे बिना… जिया जाये ना’ हे गाणं आपल्यावर प्रेम करणाऱ्या तुम्हा सर्व चाहत्यांसाठी समर्पित आहे, हे सांगून उदयनराजेंनी आपलं प्रेम गाण्यातून अधोरेखित केलं.

पाहा व्हिडिओ :

जल्लोष गाण्यांचा कार्यक्रमात उदयनराजेंची एन्ट्री ही नेहमीसारखी हटकीच ठरली. रॅम्पवर जाऊन त्यांनी सातारकर जनतेला कॉलर उंचावत अभिवादन केले. त्यानंतर मुख्य व्यासपीठावर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर त्यांनी केक कापून आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी गायक रोहित राऊत आणि गायिका जुईली जोगळेकर यांचा सत्कार करून त्यांचे कौतुक केले. आज दिनांक २४ रोजी दिवसभर विविध कार्यक्रमांनी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे.
तात्या, विद्युतदाहिनीत बॉडी टाकली नि… रात्री ११.३० ला वसंत मोरेंना स्मशानभूमीतून फोन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here