याबाबतची सविस्तर माहिती अशी की, नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील करमोडी गावाची श्रुती ही रहिवासी आहे. अल्पभूधारक शेतकरी सीताराम आणेराव (वय ४८) यांचे २० फेब्रुवारी रोजी रात्री निधन झाले. ते अनेक दिवसांपासून आजारी होते. १० फेब्रुवारी रोजी रात्री झोपेतून उठून बाथरूमकडे जाताना चक्कर येऊन ते डोक्यावर पडले. यानंतर त्यांच्यावर नांदेड येथे उपचार सुरू होते. परंतु सोमवारी सायंकाळी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली.
सीताराम आणेराव यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, पत्नी, भाऊ, आई असा परिवार आहे. व्यवहारे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चिंचगव्हाण येथे १२ वी इयत्तेत श्रुती शिक्षण घेत आहे. श्रुतीला एकीकडे परीक्षा अन् दुसरीकडे वडिलांचा अंत्यविधी अशा परिस्थितीचा सामना करावा लागला. तिच्या परीक्षेमुळे नातेवाईकांनी अंत्यविधी लवकर उरकून घेतला आणि ती मनाठा येथे परीक्षा केंद्रावर परीक्षेसाठी वेळेत हजर झाली.
दरम्यान, दुःख सावरत श्रुती आणेराव हिने परीक्षा दिली. तिने दाखवलेल्या या कणखरपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.