मुंबई: मुख्यमंत्री यांच्या भेटीसाठी गेलेल्या शेतकऱ्यासह त्याच्या आठ वर्षांच्या मुलीला ‘मातोश्री’बाहेर पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या प्रकारावरून माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते यांनी टीकास्त्र सोडलं आहे. ‘मातोश्री’बाहेर अवघ्या आठ वर्षांच्या मुलीला अशी वागणूक मिळत असेल तर, राज्यातील जनतेनं अपेक्षा करायची तरी कुणाकडून, असा सवाल त्यांनी केला आहे.

बँकेच्या कर्जामुळं हैराण झालेल्या एका शेतकऱ्यानं त्याच्या मुलीसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’वर जाण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री ठाकरे यांना भेटण्यासाठी हा शेतकरी आला होता. मात्र पोलिसांनी त्या शेतकऱ्याला अडवलं. त्यानंतर ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात घेऊन गेले. देशमुख असं या शेतकऱ्याचं नाव असून, ते पनवेलहून मुख्यमंत्री ठाकरे यांना भेटण्यासाठी आले होते. त्यांच्यासोबत त्यांची आठ वर्षाची मुलगीही होती. मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी सकाळपासून मातोश्रीबाहेर उभं राहिल्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट होत नाही, असं लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांना आतमध्ये जाऊ देण्याची विनंती केली. मात्र पोलिसांनी त्यांना आतमध्ये जाऊ दिलं नाही. त्यामुळे निराश झालेल्या देशमुख यांनी थेट मातोश्रीतच घुसण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे सतर्क झालेल्या पोलिसांनी देशमुख यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मला मुख्यमंत्र्यांना भेटू द्या, मला ठार मारणार आहात का? असा आर्त सवाल देशमुख यांनी पोलिसांना केला. मात्र पोलिसांनी त्यांना मुख्यमंत्र्यांना भेटू न देता त्यांची रवानगी पोलीस ठाण्यात केली. कोणत्याही पूर्व परवानगीशिवाय मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी शेकडो लोक रोज ‘मातोश्री’ येथे येत असतात. त्यामुळे या लोकांशी असे वागावेच लागते, अशी सारवासारव पोलिसांनी केली आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या शेतकऱ्याला सोडून देण्याचे आदेश देत, त्यांचे काय काम आहे, त्याची विचारपूस करण्यासही सांगितले आहे.

दरम्यान, यावरून माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. शेतकऱ्यांवर अन्याय तर होत आहे. पण अवघ्या आठ वर्षांच्या मुलीला मातोश्रीबाहेर अशी वागणूक मिळत असेल तर राज्यातील जनतेनं अपेक्षा करायची तरी कुणाकडून, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्र्यांनी या घटनेची दखल घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

8 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here