एमएमपीएचे अध्यक्ष सी.के. सिंह यांनी म्हशीच्या दुधाचे दर वाढवले जात असल्याचं सांगितलं. शहरातील ३ हजारहून अधिक दूध विक्रेते आहेत. आता शहरातील दूध रिटेलर्सना म्हशीचं दूध ८० रुपये प्रति लिटर ऐवजी ८५ रुपये लीटर प्रमाणं मिळेल. म्हणजेच किरकोळ ग्राहकांना म्हशीचं दूध एक लीटर घ्यायचं असेल तर त्यांना ९० ते ९५ रुपये मोजावे लागणार आहेत. नव्या किमती १ मार्च ते ३१ ऑगस्ट पर्यंत लागू राहणार आहेत.
मुंबईत म्हशीच्या दुधाच्या विक्री दरात यापूर्वी सप्टेंबर २०२२ मध्ये वाढ करण्यात आली होती. त्यावेळी म्हशीचे दूध ७५ रुपयांवरुन ८० रुपये करण्यात आलं होतं. त्यामुळं गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांचं बजेट कोलमडलं होतं.
एमएमपीएच्या सर्वसाधारण सभेत दूध दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. चारा, भुस्सा आणि इतर वस्तूंच्या किमतीमध्ये १५ ते २० टक्के वाढ झाली आहे. त्यामुळं नाईलाजानं दुधाच्या किमती वाढवाव्या लागत असल्याचं ते म्हणाले. मुंबईत दररोज म्हशीच्या ५० लाख लीटर दुधाची विक्री होते.
अमूलकडून ही दरवाढ
भारतातील सर्वात मोठा दूध ब्रँड म्हणून ओळख असलेल्या गुजरात डेअरी कॉ ऑपरेटिव्ह म्हणजेच अमूलनं याचं महिन्यात दुधाच्या दरात ३ रुपयांची वाढ केली आहे. अमुलनं २ फेब्रुवारी २०२३ पासून दरवाढ लागू केली आहे. त्यामुळं अमूल गोल्ड दूध आता ६६ रुपये, अमूल ताजा ५४ रुपये लीटर, अमूल ए२ म्हशीचं दूध ७० रुपये लीटर झालं होतं. त्यानंतर जवळपास सर्वच दूध उत्पादकांनी दुधाच्या दरात २ रुपयांची वाढ केली होती.