रांजणी ता. घनसावंगी येथील दत्ताभाऊ वरखेडे यांनी २३ मार्च रोजी ६० क्विंटल कापूस आयशरमध्ये (क्र.एम.एच. १३ आर ०८८९)विक्रीसाठी भरून रांजणी येथील तुळजाई कृषी सेवा केंद्रासमोर उभा केला होता. याच दिवशी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरंट्यांनी भरलेल्या कापसासह आयशर चोरून नेला.ही घटना सकाळी शेतकरी दत्ताभाऊ वरखेडे यांच्या लक्षात येताच त्यांना रडू कोसळले.
चोरीबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी दत्ताभाऊ वरखडे यांच्याकडे अधिक चौकशी केली असता सदरील आयशर हे ६० ते ७० किलोमीटर गेल्यावर आपोआप बंद पडते असे त्यांनी सांगितले. त्यावरून पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहा पथके तैनात केली. घटनास्थळापासून ६० ते ७० कि.मी.अंतरापर्यंत चोरी गेलेल्या आयशर ट्रक व कापसाचा परिसरात शोध घेतला.
सीसीटीव्ही फुटजेच्या आधारे सदरील कापूस व आयशरचा अवघ्या ६तासात पोलिसांनी शोध घेतला. सदरील कामगिरी पोलीस अधिक्षक डॉ. अक्षय शिंदे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, पोलीस उपनिरीक्षक युवराज टाकसाळ, पोलीस हेड कॉन्स्टेबल रामचंद्र खलसे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय जाधव, पोलीस नाईक बाबासाहेब डमाळे, सुनिल वैद्य, गणेश मोरे आदिंनी पार पाडली. सदरील घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक टाकसाळ करत आहे. आयशर आणि कापूस दोन्ही मिळून आल्याने शेतकऱ्यांनी पोलीस खात्याचे आभार मानले आहेत.