या धक्कादायक घटनेच्या तपासात आरोपी नाम सुमित बाळासाहेब जेबे (वय.२६,रा. संगमवाडी ढोलेपाटील रोड, मुळ.औरंगाबाद) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत पिडीत तरुणीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार जेबे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत तपास पथकाच्या प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक कल्याणी पाडोळे यांनी सांगितलं, की फिर्यादी तरुणी महाविद्यालयातील पदवीच्या पहिल्या वर्षात शिकते. तर तिचा लहान भाऊ देखील पुण्यात शिक्षण घेतो. त्याला एका नामांकित शैक्षणिक क्लासेसमध्ये प्रवेश घ्यायचा होता. आरोपी जेबे हा त्या क्लासेसमध्ये कन्सलटंट म्हणून काम करतो. या तरुणीचा भावाच्या प्रवेशाच्या चौकशीदरम्यान आरोपीशी परिचय झाला होता. फिर्यादी तरुणी आणि तिचा भाऊ पुण्यात शिक्षणासाठी आल्यानंतर त्यांचा परिचय वाढत गेला. पुढे क्सासेसच्या नोट्स देणं-घेण्यातून जेबे याने संबधीत तरुणीला हॉटेलमध्ये बोलावून गुंगीचे औषध पाजून तिच्यावर जबरस्तीने लैंगिक अत्याचार केला.
ज्यावेळी तरुणीला हे समजलं त्यावेळी त्याने झालेल्या प्रकाराबाबत कोणाला काही सांगितलं तर फोटो घरच्यांना आणि सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर देखील त्याने तरुणीला धमकावून वेळोवेळी लैंगिक अत्याचार करून पैसे उकळले. मात्र सतत होणार्या त्रासाला कंटाळून तरुणीने एकेदिवशी हा प्रकार आपल्या घरच्यांच्या कानावर घातला. त्यानंतर त्यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी घटनेचे गांभिर्य पाहता तात्काळ गुन्हा दाखल करून दोन तासांत आरोपी जेबे याला अटक केली.