श्वेता राजेश आनंद (वय ५, रा. उत्तमनगर, शिवणे) असं मृत मुलीचे नाव आहे. या प्रकरणी तीच्या ३६ वर्षीय आईवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ह्रतिका राजेश आनंद असं आरोपी आईचं नाव आहे. ही घटना गुरूवारी दिनांक २३ सकाळी नऊ ते दुपारी दिड वाजेच्या सुमारास घडली आहे. याबाबत पोलीस हवालदार घोलप यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार श्वेताचे वडील एका खासगी कंपनीत लेबर म्हणून काम करतात. श्वेताच्या पहिल्या आईचा मृत्यू झाल्यावर त्यांनी हा दुसरा विवाह केला होता. त्यांच्या दुसर्या पत्नीस पहिल्या पतीपासून दोन मुले असून ते मिरज येथे शिक्षण घेतात. श्वेताच्या आईचा मृत्यू झाल्यापासून ती इतर कोणाकडे राहात नव्हती. आईची आठवण येत असल्याने ती सावत्र आईकडे देखील नीट राहात नव्हती. श्वेता सातत्याने त्रास देत असल्याने तीची सावत्र आई तीला सतत मारहाण करायची.
मात्र, मारहाण करुनही श्वेताचा त्रास बंद होत नसल्याने मागील दोन तीन दिवसांपासून तीने श्वेताला चटके देण्यास सुरवात केली. यानंतर गुरूवारी सकाळी तीने श्वेताच्या डोक्यात कठीण वस्तू मारुन तीची हत्या केली. श्वेता निपचीत पडल्यावर पतीला काय सांगायचे हा प्रश्न सावत्र आईपुढे उभा राहिला. यानंतर तीने श्वेताला जवळच्या डॉक्टरकडे नेत तीला फिट आल्याचे सांगितले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करता ती मृत झाल्याचे लक्षात आले आणि श्वेताच्या अंगावर चटके दिल्याचे डाग देखील होते.
हा प्रकार संशयास्पद असल्यामुळे रुग्णालयातून डॉक्टरांकडून पोलिसांना कळवण्यात आले. त्यानंतर आरोपी आईला पोलिसांनी ताब्यात घेतलं. मुलगी सतत त्रास देत असल्याने तीला मारहाण करत हत्या केल्याची कबुली आरोपी आईने दिली. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल जैतापुरकर करत आहेत.