२३ जानेवारी रोजी हा अदानी शेअर ३९९८.५० रुपयांवर व्यवहार करत होता, जो ५२ आठवड्यांचा उच्चांक आहे. पण एका दिवसानंतर आलेल्या हिंडेनबर्ग अहवालाने त्याला नीचांकी पातळीवर फेकले. अदानी टोटल गॅसचा स्टॉक आतापर्यंत ८० टक्क्यांहून अधिक घसरला, मात्र आता या शेअरची घसरण थांबेल अशी अपेक्षा आहे. शेअर्समधील घसरणीच्या काळात कंपनीसाठी एक आनंदाची बातमी आली. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, कंपनीच्या धामरा टर्मिनलवर एप्रिलमध्ये पहिला एलएनजी माल पोहोचण्याची अपेक्षा आहे. ही शिपमेंट आल्यानंतर ३० ते ४५ दिवसांनी तेथून व्यावसायिक कामकाजाला सुरुवात होईल, म्हणजेच जूनच्या मध्यात काम सुरू होऊ शकते.
वार्षिक पाच दशलक्ष टन क्षमतेचे हे एलएनजी टर्मिनल सप्टेंबर २०२१ मध्ये कार्यान्वित होणार होते परंतु त्याला विलंब झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील ऊर्जा मिश्रणातील नैसर्गिक वायूचा वाटा ६% वरून १५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची योजना आखली असून हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वरील टर्मिनल महत्त्वाचे मानले जात आहे. धामरा टर्मिनलमुळे पूर्वेकडील राज्यांमध्ये गॅसच्या वापराला चालना मिळेल. पूर्व किनारपट्टीवरील हे देशातील दुसरे आयात टर्मिनल असून पश्चिम किनारपट्टीवर पाच आयात टर्मिनल आहेत.
अदानी गॅसचा शेअर
मागील महिन्याभरात अदानी टोटल गॅसचा शेअर ८०% पेक्षा जास्त तुटला असून सध्या त्याला सतत लोअर सर्किट लागत आहे. २३ जानेवारी रोजी शेअर ३९९८.५० रुपयाच्या आपल्या उच्चांका होता, शुक्रवारी पुन्हा ५% घसरून स्टॉक ७५३.६० रुपयांवर क्लोज झाला. अशा प्रकारे आतापर्यंत स्टॉक ३२४४.९ रुपयांनी खाली घसरला आहे. दरम्यान, यानंतर आता पुढे अदानी शेअर्सची स्थिती बाजारात सुधारते की आणखी बिघडते याकडे सर्वांची नजर असेल.