Girl died due to vomit | जळगावात एका विचित्र प्रकारामुळे आठ वर्षांच्या चिमुरडीचा करुण अंत झाल्याचा प्रकार समोर आला आहे. अनुष्का मुकेश जावरे या लहान मुलीच्या घशात उलटी अडकली. त्यामुळे तिचा श्वास कोंडला गेला.

हायलाइट्स:
- जुने जळगाव भागातील भोईवाड्यातील रामपेठेतील घटना
- चिमुकलीसोबत भयंकर प्रकार घडला
जळगाव शहरातील जुने जळगाव भागातील भोईवाड्यातील रामपेठमध्ये मुकेश एकनाथ जावरे व अलका मुकेश जावरे हे आपल्या आठ वर्षांची मुलगी अनुष्का हिच्यासोबत वास्तव्यास आहेत. अनुष्का ही जळगाव शहरातील महापालिकेची शाळा क्रमांक ३ मध्ये सिनियर केजी या वर्गात शिक्षण घेत होती. शुक्रवारी अनुष्का ही सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत गेली होती. दुपारी शाळा सुटल्यानंतर ती घरी आली. शाळेतून घरी आल्यानंतर तिने आपली तब्येत ठीक नसल्याचे सांगितले. तिचं अंग गरम असल्याने, तिला ताप असावा म्हणून अनुष्का हिची आई अलका यांना अनुष्काला झोपविण्याचा प्रयत्न केला.
याचदरम्यान अनुष्काला अचानक दोन वेळा उलटी झाली. गुळण्या करुन पाणी पाजून आईने अनुष्काला पुन्हा झोपवलं. मात्र, अनुष्काला पु्न्हा उलटी झाली. मात्र, यावेळी अनुष्का झोपेत असल्याने उलटी तोंडाबाहेर न येता तिच्या घशातच अडकली. त्यामुळे अनुष्काचा श्वास गुदमरला आणि ती बेशुद्ध पडली. अलका जावरे यांनी घाबरुन अनुष्काला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच अनुष्काने जगाचा निरोप घेतला होता. रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी अनुष्काला मृत घोषित केले.
एकुलत्या मुलीच्या मुत्यूने कुटुंबीयांना धक्का अन् रामपेठ परिसर सुन्न
अनुष्का शाळेत गेली आणि परतली तेव्हा कुणालाही असे काही घडेल, याची कल्पना नव्हती. मात्र, काही वेळात उटली झाली आणि अनुष्काची प्रकृती जास्त खालावली आणि उपचार करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. अनुष्का ही एकुलती एक मुलगी होती. अनुष्काचे वडील जळगावातील एमआयडीसीतील एका कंपनीत नोकरीला आहेत. अनुष्का ही प्रचंड हुशार असल्याने तसेच प्रचंड बोलकी रामपेठमधील प्रत्येकजण तिला ओळखत होता. कुटुंबाप्रमाणेच गल्लीतील रहिवाशांची तसेच शाळेतील शिक्षकांचीही ती लाडकी होती. एकुलत्या एक मुलीच्या अचानक जाण्याने अनुष्का हिच्या आई-वडीलांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. या घटनेने रामपेठ परिसर सुध्दा सुन्न झाला आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.