राष्ट्रवादीचे ‘कारभारी’ अजित पवार यांनी चिंचवड विधानसभा मतदार संघाची जबाबदारी सुरूवातीपासूनच आमदार सुनील शेळके यांच्याकडे सोपवली होती. पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यापासून शेळके यांनी राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीची बाजू प्रभावीपणे मांडण्याची भूमिका ठेवली. अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांची मनधरणी करण्यासाठी शेळके यांनी पुढाकार घेतला. त्यासोबत त्यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांच्यावर कडाडून टीका करण्याचे धाडस दाखवले.
एकीकडे स्टार प्रचारकांच्या यादीत वरच्या क्रमांकावर नाव असलेले शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी प्रचारातून काढता पाय घेतला. त्यामुळे फर्डा वक्ता असलेल्या अमोल कोल्हेंनी राष्ट्रवादीची चांगलीच गोची केली. दुसरीकडे अजित पवारांच्या हुकमी एक्काने अर्थात सुनील शेळकेंनी मैदान मारत राष्ट्रवादीत आपली जागा वरच्या क्रमांकावर स्थापित केली आहे.
वास्तविक, भाजपा आणि राष्ट्रवादीसह सर्वपक्षीय स्थानिक भूमिपुत्रांमध्ये आमदार सुनील शेळके यांचे नात्या-गोत्यांचे संबंध आहेत. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचे आमदार शेळके नात्याने दाजी लागतात. शेळके यांचा गोतावळा पिंपरी-चिंचवडमध्ये मोठा आहे. असे असतानाही शेळके यांनी पक्षधर्म पाळला आणि भारतीय जनता पार्टीसह महायुतीच्या विरोधात रान पेटवले.
२०१४ पर्यंत शहरात राष्ट्रवादीची निर्विवाद सत्ता होती. पण, दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि त्यानंतर आमदार महेश लांडगे यांनी राष्ट्रवादीला भगडाद पाडले. महापालिका निवडणूक आणि त्यानंतर विधानसभा, लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पिछाडीवर गेली. याचे मूळ कारण जगताप आणि लांडगे यांच्याविरोधात थेटपणे कोणीही राष्ट्रवादीची बाजू सक्षमपणे मांडली नाही. नाती-गोती, गावकी-भावकी आणि व्यावसायिक हितसंबंधांमुळे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी कधीही जगताप आणि लांडगे यांच्याविरोधात थेट टीका-टिपण्णी करण्याचे धाडस दाखवले नाही. मधल्या काळात राष्ट्रवादीने खांदेपालट करुन पाहिले. शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्याकडून प्रखर भूमिका मांडली जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, त्यात अजित पवार यांचा अपेक्षाभंग झाला. अखेर आमदार सुनील शेळके यांचे ‘शस्त्र’ बाहेर काढून अजित पवार यांनी भाजपा आणि महायुतीच्या स्थानिक नेत्यांना सळो की पळो करुन सोडले.
मावळातील दीड हजार कार्यकर्त्यांची फौज…
चिंचवडची पोटनिवडणूक अजित पवार यांच्या सूचनेनुसार, सुनील शेळके यांनी आपल्या हातात घेतली. वार्डनिहाय, गावनिहाय निवडणुकीची योजना आखण्यात आली. स्थानिक कार्यकर्ते, संभाव्य फितूरी याचा अंदाज घेत मावळ विधानसभा मतदार संघातील तब्बल दीड हजार कार्यकर्त्यांची फौज आमदार शेळके यांनी चिंचवडच्या मैदानात उतरवली आहे, असा दावा केला जातो. सुरूवातीपासून सोशल मीडिया आणि घर टू घर असा प्रचार यंत्रणा राबवण्यासाठी शेळके यांची पर्यायी यंत्रणा असल्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांना ही निवडणूक सोपी झाली नाही, तर भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.
स्थानिक नेत्यांचे अपयश पुन्हा चव्हाट्यावर
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील स्थानिक नेते माजी आमदार विलास लांडे, आमदार अण्णा बनसोडे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी महापौर संजोग वाघेरे, योगेश बहल यांच्यावर अवलंबून न राहण्याची अप्रत्यक्ष रणनिती राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कायम ठेवली. ‘‘आले तर आल्यासोबत नाही आले तर स्वत:च्या बळावर निवडणूक लढवायची आणि जिंकायची…’’ असा निर्धार राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींनी ठेवला. त्यामुळे निवडणूक निरीक्षण म्हणून जबाबदारी असलेले आमदार सुनील शेळके यांना मोठी संधी मिळाली. त्यांनी पक्षश्रेष्ठींच्या सूचनेप्रमाणे कामाची चुणूक दाखवली. त्यामुळेच सुरूवातील भाजपाकडे झुकलेली ही निवडणूक चुरशीची वाटू लागली. त्यामुळेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना प्रचारासाठी, रॅलीसाठी रस्त्यावर उतरावे लागले. आमदार शेळके यांची रणनिती आणि प्रभावी कार्यपद्धती यशस्वी झाली. निवडणुकीचा निकाल काहीही लागला, तरी शेळके यांनी पक्षश्रेष्ठींच्या मनात स्थान मिळवले. दुसरीकडे, या निवडणुकीत संधी असतानाही राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवता आली नाही.
हौसे-गवसे आता मैदानाबाहेर
विधानसभा पोटनिवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर स्थानिक पातळीवर ‘कंट्रोल’ करुन भाजपाचा सुपडासाप करण्याच्या आणाभाका करणारे ऐन निवडणुकीत मैदानातून गायब झाले. राजकीय रणनिती आणि प्रचार यंत्रणा प्रभावीपणे राबवून विधानसभा आणि आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला विजयापर्यंत पोहोचवण्याचा वल्गना हवेत विरल्या. त्यामुळेच अजित पवार यांना सुनील शेळके यांचा पत्ता बाहेर काढावा लागला. यापुढील काळात स्थानिक नेत्यांच्या कचखाऊ नेतृत्वावर अवलंबून न रहाता, आमदार शेळके यांच्यामाध्यमातून पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्वोतोरी प्रयत्न करेल, असा दावा राष्ट्रवादीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमधून व्यक्त केला जात आहे.