वर्षभरापूर्वी प्रेम प्रकरण सुरू
मृत तरूणी ही अल्पवयीन असून सोलापुरातील एका महाविद्यालयात अकरावी इयत्तेत शिक्षण घेत होती. वर्षभरापूर्वी सुट्टीच्या निमित्ताने सदर तरूणी ही मामाच्या गावी खुणेश्वर येथे गेली होती. तेव्हा खुणेश्वरमध्ये राहणाऱ्या सुरज चव्हाण याच्यासोबत तिचे सूत जुळले. मात्र प्रेम प्रकरणाची चाहूल लागताच मुलीला परत आई-वडिलांकडे पाठवण्यात आले होते.
दोन महिन्यांपूर्वी झाली होती बैठक
अल्पवयीन तरूणीच्या आई वडिलांनी तिला सूरजसोबत लग्न करण्यास विरोध केला होता. तरूणीच्या वडिलांनी आणि काकांनी खुणेश्वर येथे जाऊन बैठक घेत लग्नास नकार दिला होता. सुरज चव्हाण हा चिंचोळी एमआयडीसीमधील एका कंपनीत नोकरी करत होता. सुरजच्या घरची परिस्थिती बेताची आहे. गावात राहण्यासाठी पत्राच्या शेड आहे. अल्पवयीन तरुणीच्या कुटुंबियांनी परिस्थिती पाहून दोघांच्या प्रेमाला विरोध केला होता. परंतु दोघांनी हट्ट धरल्यामुळे तरूणीची समजूत काढत वयात आल्यावर विचार करू, आधी शिक्षण पूर्ण कर असा सल्ला दिला होता.
शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत घरी परत आलीच नाही
अल्पवयीन तरूणी ही शुक्रवारी सकाळी महाविद्यालयात गेली होती. रोजच्या प्रमाणे दुपारी घरी येईल अशी अपेक्षा होती. मात्र ती रात्री उशिरापर्यंत घरी परत आलीच नाही. तरूणीच्या घरच्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र २४ तासानंतर गुन्हा दाखल करू अशी माहिती देत नातेवाईकांकडे शोधा असा सल्ला पोलिसांनी दिला. शनिवारी सकाळी कवठे शिवारात प्रेमी युगुलाने आत्महत्या केली असल्याची वार्ता तरूणीच्या कुटुंबियांना मिळाली. त्यानंतर शासकीय रुग्णालयात येऊन खात्री केली आणि मृत मुलीला पाहून आईने हंबरडा फोडला. दोघांचे नातेवाईक शासकीय रुग्णालयात दाखल झाले असून शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू आहे.