भारतातून बाहेर देशात जाणारी कांद्याची निर्यात थांबवण्यात आली आहे. त्यामुळे बाहेर जाणारा कांदा हा इथेच असल्याने कांद्याची अवाक वाढली आहे. बाजार पेठेत कांदा जास्त प्रमाणात असल्याने त्याचा परिणाम कांद्याच्या दारावर देखील जाणून येत आहे. कांद्याला भाव मिळत नसल्याने अक्षरशः कांदा रस्त्यावर फेकून देण्याची वेळी शेतकऱ्यांवर आली आहे. कांद्याची आयात थांबल्याने भारतात ही परस्थिती झाली आहे. मात्र, इतर देशात कांद्याची टंचाई भासत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी कांद्यची किरकोळ बाजारात होणारी विक्री ही चढ्या दराने होत आहे.
मोठी बाजारपेठ असलेल्या नाशिकमध्ये कांद्याचा दर प्रति ४ ते ६ रुपये प्रति किलो जात आहे. इतरत्र झालेले उत्पादन यामुळे नाशिकसह महाराष्ट्रातील लाल कांद्याच्या मागणीत लक्षणीय घट होऊन कांद्याचे दर जवळपास ५०० रुपये क्विंटलवर घसरले आहेत. या आधी कांद्याला प्रति क्विंटल सरासरी दोन हजार रुपयांचा दर मिळाला होता. या वर्षांच्या सुरुवातीला, जानेवारीत लासलगाव बाजारात ११ लाख ६२ हजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. त्यावेळी कांद्याला सरासरी १३९२ रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला.
निर्यातबंदीचा फटका
कांद्याची भारताबाहेर होणारी निर्यात थांबवण्यात आली आहे. आशिया खंडातील कांद्यची सगळ्यात मोठी बाजारपेठ ही नाशिकच्या लासलगाव मध्ये आहे. त्यामळे कांद्याची भारतातून कांदा जगभरात जिथून केला जातो त्या नाशिकमध्ये कांद्याची आवक वाढली आहे. मागणी पेक्षा जास्त कांदा बाजारात असल्याने कांद्याला भाव मिळत नाहीये त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना लागवडीसाठी लागणारा खर्च देखील निघणे अवघड झाले आहे.
स्वाभिमानीचा आंदोलनाचा इशारा
सोलापूरमधील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी फेसबुकवर शेअर करत संताप व्यक्त केला आहे. सोलापूर शहरातील विविध मार्केट मध्ये ,किंवा हातगाडीवर कांदा १५ ते २० रुपये प्रतिकिलो दराने विक्री केला जात आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती मधील व्यापारी १ रुपया किंवा २ रुपये प्रतिकिलो लिलाव करत शेतकरी वर्गाची थट्टा करत आहेत.राज्य शासनाने त्वरित शेतकऱ्यांना अनुदान देण्याची व्यवस्था करावी अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करणार असा विजय रणदिवे यांनी इशारा दिला आहे.
निर्यातबंदी उठवा,राष्ट्रवादीची मागणी
राज्यात लाल कांद्याच्या मागणीत लक्षणीय घट होऊन कांद्याचे दर ५०० रुपये क्विंटलवर घसरले आहेत. दर गडगडल्याने कांदा बाजारात विकण्याऐवजी रस्त्यावर फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. मात्र केंद्र व राज्य सरकार सत्ताकारण व निवडणुकीमध्ये दंग आहेत.शेतकऱ्यांचे अश्रू त्यांना दिसत नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
एकीकडे अशी परिस्थिती असताना परदेशात मात्र फिलिपिन्स, तुर्कस्थान, मोरोक्को, उझबेकिस्तान तसेच युरोपातील अनेक देशांत कांदा टंचाई निर्माण झाली असून कांदाच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यात कांद्याचे दर चार वर्षांतील निचांकी पातळीवर आले आहेत. घाऊक बाजारात कांद्याची मुबलक आवक होत असताना मागणी नसल्यामुळे दरात लक्षणीय घसरण झाली आहे, अशावेळी सरकारनं कांद्यावरील निर्यातबंदी उठवावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.