कोल्हापूर : वृद्धापकाळात नातेवाईकांनी वाऱ्यावर सोडलं की आयुष्यातील साथीदार एकमेकांना धीर देत कसेबसे जीवन जगत असतात. मात्र साथीदारानेही अर्ध्यावरच डाव मोडत जगाचा निरोप घेतला तर वृध्दाश्रमाशिवाय पर्याय उरत नाही. घोसरवाड ( ता. शिरोळ) येथील जानकी वृद्धाश्रमातील अशाच दोन समदुःखी वृद्धांनी वयाच्या सत्तरीत विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी वृद्धाश्रम चालक बाबासाहेब पुजारी यांनी कायदेशीर बाबींची पूर्तता करत धुमधडाक्यात लग्न लावून दिल्याने या लग्नाची चांगलीच चर्चा होत आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, अनुसया शिंदे (वय ७०, मूळ रा. वाघोली, जि. पुणे) असं वृद्ध नववधू तर बाबूराव पाटील (वय ७५, रा. शिवनाकवाडी, ता. शिरोळ) असं नवरदेवाचं नाव आहे. दोघेही दोन वर्षांपासून येथील वृद्धाश्रमात आहेत. शरीराने स्वावलंबी असले तरी ते मानसिकदृष्ट्या खचलेल्या अवस्थेत होते. दोघांच्याही साथीदाराचं निधन झालं होतं. त्यामुळे या समदुःखी वृद्धांनी एकमेकांच्या आयुष्यातील दुःखाचा पाढा वाचून मन मोकळे करता करता दोन्ही मने जुळली आणि लग्नाच्या बंधनातून एकत्र येण्याचा निर्णय घेतला. दोघांचीही तयारी असल्याने व कायदेशीर सल्ला घेऊन गुरुवारी वृद्धाश्रमातच मांडव घालून ग्रामस्थ व प्रमुख लोकांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पार पाडत थाटात लग्न लावून देत वृद्धांची इच्छा पूर्ण केली.

मामाच्या गावी जाताच तरुणी प्रेमात; मात्र घरून लग्नाला विरोध अन् दोघांचेही मृतदेह पाहण्याची वेळ

या लग्नात ना जात पाहिली गेली ना धर्म. उर्वरित आयुष्यात सुखदुःखात सहभागी होऊन एकमेकांना मायेचा आधार असावा, इतकीच माफक अपेक्षा या वृद्ध जोडप्याला आहे.

दरम्यान, ‘दोघांनाही स्वखुषीने लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी विचारपूर्वक निर्णय घेतल्याने व कायदेशीर बाबींची पूर्तता करून त्यांची इच्छा पूर्ण करुन आनंदी जीवन जगण्यासाठी थाटात लग्न करून दिले. लग्नानंतरही वृद्धाश्रमातच राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे,’ अशी माहिती जानकी वृद्धाश्रमाचे चालक बाबासाहेब पुजारी यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here