विशाल कांबळे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. दुपारी हिरा हरिहर हे आमच्या वस्तीमध्ये पैसे वाटप करत होते त्याला विरोध दर्शवला आणि पोलिसांना फोन करुन माहिती दिली. रात्री साडे दहाच्या सुमारास त्या घटनेचा जाब विचारण्यासाठी कोयते आणि बांबू घेऊन २० ते २५ जण आले आणि विरोध का करता असा सवाल करत भावाला आणि शेजाऱ्यांना मारहाण करण्यात आली, असं विशाल कांबळे म्हणाले.
या प्रकरणाची माहिती देत असताना रमेश बागवे म्हणले की, ६३० गंज पेठ कसबा या भागामध्ये भाजपचे नगरसेवक हरिहर आणि त्यांच्या साथीदारांनी पैसे वाटण्यास विरोध केल्यानं दर्या कांबळे यांच्या मुलांना, बहिणीला आणि नातेवाईकांना बेदम मारहाण केली आहे. हा प्रकार निंदनीय असून जातीवाचक शिव्या देण्यात आल्याचा आरोप रमेश बागवे यांनी केला. तुम्हाला इथं राहण्याचा अधिकार नाही, अशा धमक्या दिल्याचा आरोप रमेश बागवे यांनी केलं. या बाबत पोलीस ठाण्यात आम्ही तक्रार दिली आहे. वरिष्ठ अधिकारी गुन्हा दाखल करण्याच काम करत आहे, असं रमेश बागवे म्हणाले.
पोलीस स्टेशनबाहेर आंदोलन
६३० गंज पेठेतील या प्रकारानंतर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मिठगंज पोलीस स्टेशनबाहेर गर्दी केली होती. गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी नागरिक मोठ्या संख्येनं जमा झाले होते. दरम्यान, कसबा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरु झालं आहे. भाजपचे हेमंत रासने आणि काँग्रेचे रवींद्र धंगेकर अशी लढत कसबा मतदारसंघामध्ये रंगली आहे. जोरदार प्रचारानंतर तोफा थंडावल्या, मात्र पैसे वाटत असताना २४ फेब्रुवारीच्या रात्रीच्या एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्याची दखल घेत रवींद्र धंगेकर यांनी चौकशी मागणी करत भाजपवर जोरदार आरोप केले. त्यासोबत धंगेकर यांनी कसबा गणपती येथे उपोषण केलं. पोलिसांच्या विनंती नंतर आंदोलन मागे घेण्यात आलं होतं.