पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित नवीन आणि आरोपी हरिहरा कृष्णा दिलसुखनगरमधील एकाच महाविद्यालयात शिकले. नवीनचे एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. दोन वर्षांनी प्रेमसंबंध संपुष्टात आले. त्यानंतर हरिहरा कृष्णा त्या तरुणीच्या संपर्कात आला. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. ब्रेक अप होऊनही दोन वर्षे उलटून गेल्यानंतरही नवीन आपल्या प्रेयसीला मेसेज करत असल्यानं आरोपी हरिहरा कृष्णा संतापला. नवीन पुन्हा एकदा तरुणीसोबत सूत जुळवण्याचा प्रयत्न करत असल्याचं कृष्णाला वाटत होतं. त्यामुळे तो नवीनचा काटा काढण्याच्या तयारीत होता. त्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून तो कट रचत होता.
१७ फेब्रुवारीला कृष्णा आणि नवीन हैदराबाद शहराच्या बाहेर असलेल्या अब्दुल्लाहपूर येथे पार्टीसाठी भेटले. दारुच्या नशेत असलेल्या दोघांचा वाद झाला. माझ्या प्रेयसीला कॉल, मेसेज का करतोस अशी विचारणा करत कृष्णानं नवीनवर हल्ला केला. त्यानं नवीनची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर कृष्णानं नवीनचं गुप्तांग आणि हृदय कापून काढलं. त्यानं नवीनची बोटंदेखील कापली आणि त्याचे फोटो प्रेयसीला पाठवले. कृष्णा मस्करी करत असल्याचं प्रेयसीला वाटलं. त्यामुळे तिचा फोटोंवर विश्वास बसला नाही.
नवीनशी संपर्क होत नसल्यानं त्याच्या कुटुंबीयांनी कृष्णाशी संपर्क साधला. आपल्याला नवीनचा ठावठिकाणा माहीत नसल्याचं कृष्णानं त्याच्या कुटुंबीयांना सांगितलं. त्यानंतर नवीनच्या कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. आपल्याला पोलीस अटक करणार याची कल्पना येताच कृष्णा स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला. त्यानं संपूर्ण घटनाक्रम पोलिसांना सांगितला. पोलिसांनी त्याला अटक करुन पुढील तपास सुरू ठेवला आहे.