जेवणाची वेळ सुरू होताच वधूकडच्या नातेवाईकांची रांग लागली. मुलीकडचे केशव गोपीनाथ मुंडे जेवणाच्या पंगतीत वाढत होते. त्यावेळी तिघा जणांनी त्याला तुझ्या घरात लग्न आहे. आम्ही तुझे पाहुणे आहोत. आधी आम्हाला जेवायला वाढ असं म्हणत त्याच्याशी वाद घातला. त्यावर मुंडेंनी पहिल्यांदाच एक पंगत बसलेली होती. एवढी पंगत झाल्यानंतर तुम्हाला जेवायला वाढतो असं उत्तर दिलं. यानंतर एकाच घरातील नितीन विश्वनाथ मुंडे, अमोल विश्वनाथ मुंडे, सचिन विश्वनाथ मुंडे आणि आकाश ज्ञानोबा मुंडे यांना राग अनावर झाला. तू घरातील व्यक्ती असून आम्हाला जेवायला वाढत नाहीस. हा आमचा अपमान आहे असे म्हणत केशव मुंडेंशी शाब्दिक बाचाबाची सुरू केली.
केशव मुंडेंनी अनेकदा विनवणी करूनदेखील वाद घालणारे ऐकत नव्हते. तुझ्या घरच्या लग्नात बोलावून तू आमचा अपमान करतोयस, असं म्हणत लग्नाच्या मंडपात चौघांनी बेल्ट काढून केशव मुंडेंवर हल्ला चढवला. भर लग्नात आणि जेवणाच्या पंगतीत हा प्रकार सुरू झाल्याने पाहुण्यांमध्ये खळबळ उडाली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे लग्न समारंभात काही वेळासाठी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. चौघांनी बेल्टनं मारल्यानं केशव मुंडेंच्या शरीरावर जखमा झाल्या. केशव मुंडे यांच्या तक्रारीवरून चौघांविरोधात अंबाजोगाई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.