दहावीची परीक्षा देण्याच्या तयारीत असलेले तिघेही मरळी (ता. पाटण) येथील राहणारे आहेत. बाळासाहेब देसाई कारखाना परिसरात त्यांचा अपघात झाला. दहावीच्या निरोप समारंभादिवशीच ही दुर्दैवी घटना शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली.
मरळी येथील वत्सलादेवी विद्यालयात शनिवारी दहावी वर्गातील विद्यार्थ्यांचा शुभचिंतन व निरोप समारंभ आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाला जाण्याच्या तयारीत असलेले दहावीच्याच वर्गातील प्रतिक पाटील, हर्षद पाटील व सुमित टोपले हे विद्यार्थी मोटरसायकलवरून फिरत होते. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास हे तिघे एकाच मोटारसायकलवरून मरळीहून देसाई कारखान्याच्या दिशेने जात असताना त्यांचा अपघात झाला.
गणेश मंदिरासमोरील उताराला आले असता दुचाकीवरील ताबा सुटल्याने समोर येणा-या सुमो गाडीला मोटारसायकलची जोराची धडक बसली. या धडकेत मोटरसायकल चालक प्रतिक पाटील हा विद्यार्थी जागीच ठार झाला. तर हर्षद पाटील व सुमित टोपले हे जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले.
निरोप समारंभादिवशीच एका विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने मरळी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शवविच्छेदानानंतर प्रतिक चा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अपघाताची नोंद मल्हारपेठ पोलीस ठाण्यात झाली आहे. तपास स.पो.नि. उत्तम भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवा. पी. एच. जगदाळे व पी.व्ही. पाटील करत आहेत.
दरम्यान, या घटनेमुळं शाळकरी विद्यार्थ्यांकडे दुचाकी देण्यापूर्वी पालकांनी विचार केला पाहिजे, अशी भावना व्यक्त होत आहे.