सिडको परिसरात गावगुंडांचा हैदोस दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आता या गावागुंडांची मजल अगदी छोट्या छोट्या कारणांवरून थेट घरात घुसून महिलांवर हल्ला कारण्यापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे गावगुंडांवर पोलिसांचा वचक उरला नसून नागरिकांकडून पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अंगणातील झाडावरून चिकू तोडल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलेवर एका संशयिताने हल्ला केला तर या महिलेने न घाबरता मोठ्या हिमतीने त्याचा विरोध केला. यावेळी आरडा ओरड झाल्याने शेजारील नागरिक जमा होऊ लागल्याने संशयित गावगुंडाने सदर महिलेस धमकावत तेथून पळ काढला.
असे असले तरी दुसरीकडे मात्र या हल्ल्यात किरकोळ जखमी झालेल्या महिलेने व तिच्या कुटुंबीयांनी या गावगुंडाची धास्ती घेतली आहे. तर पोलिसांनी सिडको भागात अशा गावगुंडांचा वेळीच बंदोबस्त लावावा, अशी मागणी देखील येथील स्थानिक नागरिक करत आहे. दरम्यान, महिलेवर हल्ला झाल्याच्या घटनेने परिसरातील महिला वर्गाकडून परिसरात वावरत असताना भीती व्यक्त केली जात आहे. गल्ली बोळात चौका चौकात थांबलेल्या उपद्रवी टवाळखोरांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी गस्त घालावी, अशी मागणी देखील परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.