आम्ही उद्धव ठाकरे गटाचा निधी किंवा अन्य मालमत्तेवर दावा सांगणार नाही. आमच्यासाठी फक्त बाळासाहेबांचे विचार महत्त्वाचे आहेत. मी देणार आहे, घेणारा नाही, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले. त्यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी शिंदे गट शिवसेनेची बँक खाती व इतर मालमत्ता ताब्यात घेऊन ठाकरेंची आर्थिक रसद तोडणार, याबाबत सुरु असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. आम्ही गहाण ठेवलेले शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह सोडवून घेतले आहे. त्यामुळे आता आम्हाला अन्य गोष्टींची गरज नसल्याचेही एकनाथ शिंदे यांनी सूचित करण्याचा प्रयत्न केला. तसेच आगामी काळात आम्ही ठाकरे गटाला आमच्या कृतीतून प्रत्युत्तर देऊ, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
२०२४ मध्ये मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण?
एकनाथ शिंदे यांनी शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अनेक राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले. २०२४ मध्ये तुम्हीच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असणार का, असा प्रश्न त्यांना यावेळी विचारण्यात आला. त्यावर एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल हे जनता ठरवेल.
ठाकरे विरुद्ध शिंदे गटातील वाद सर्वोच्च न्यायालयात
शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. ठाकरे गटाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयालाही न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला तातडीने स्थगिती देण्यास नकार दिला आहे. तोपर्यंत परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, आगामी काळात शिंदे गटाकडून शिवसेनेच्या काही शाखा टप्प्याटप्प्याने ताब्यात घेतल्या जाऊ शकतात.