aditya thackeray | आदित्य ठाकरे यांनी वरळीतील सभेत शिंदे गटावर टीकास्त्र सोडले. यावेळी त्यांनी शिंदे गटातील ४० बंडखोर आमदारांना इशारा दिला. तसेच एकनाथ शिंदे यांना वरळीतून लढण्याचे आव्हानही आदित्य ठाकरे यांनी दिले.

हायलाइट्स:
- अलीबाबा आणि ४० चोरांचे हे सरकार अल्पायुषी आहे
- या सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही
या मेळाव्यात आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाच्या आमदारांवर घणाघाती टीका केली. गद्दार लोकांनी नाव चोरलं, चिन्हं चोरलं. पण या खुर्च्या चोरू शकत नाही. अलीबाबा आणि ४० चोरांचे हे सरकार अल्पायुषी आहे. या सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही, त्यापूर्वीच हे सरकार कोसळेल. शिवसेना पक्ष फोडणाऱ्या ४० आमदारांना, आपण नवे सरकार स्थापन केले, असे वाटत असेल. पण प्रत्यक्षात त्यांनी राजकीय व्हीआरएस घेतली आहे. केवळ शिवसेना पक्ष फोडण्यासाठी त्यांचा वापर करण्यात आला आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.
यावेळी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा थेट आव्हान दिले. वरळीतून माझं डिपॉझिट जप्त होईल, असे तुम्हाला वाटत असेल तर मी तुमच्याविरोधात ठाण्यातून लढायला तयार आहे. मी तुमच्या कोपरी-पाचपाखाडी परिसरात येऊन निवडणूक लढवेन. अन्यथा तुम्ही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन माझ्याविरोधात वरळीतून निवडणूक लढवून दाखवावी, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. यावर आता शिंदे गटाकडून काय प्रत्युत्तर दिले जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
शिंदे गटाकडून शिवसेनेच्या सर्व ५५ आमदारांना व्हीप
आजपासून सुरु होत असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने ठाकरे गट आणि शिंदे गटातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह बहाल केले होते. त्यानंतर आता शिंदेंच्या शिवसेनेकडून सर्व ५५ आमदारांना व्हिप म्हणजे पक्षादेश बजावण्यात आला आहे. दोन आठवडे कोणीही व्हिप न बजावण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले असतानाही हा व्हिप बजावण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.