मुंबई : जगभरातील मराठी बांधव आज मराठी भाषा गौरव दिन साजरा करत आहे. याच दिनाचं औचित्य साधत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून मराठी भाषिकांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. तसंच मनसेकडून मराठी भाषेसंदर्भात करण्यात येणारं काम आणि इतर राजकीय पक्षांच्या उदासीनतेवरही राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टमधून भाष्य केलं आहे.

“कुसुमाग्रजांच्या सांस्कृतिक क्षेत्रातील अतुलनीय योगदानाला अभिवादन म्हणून तेव्हाच्या सरकारने कुसुमाग्रजांचा जन्मदिवस, २७ फेब्रुवारी, ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून घोषित केला. मात्र नेहमीप्रमाणे सरकारी उदासीनतेत तो साजरा व्हायचा. कुठल्याही राजकीय पक्षालाही तो साजरा करायची इच्छा नव्हती. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तो अत्यंत उत्साहात साजरा करायला सुरुवात केली. मराठी भाषेला ‘अभिजात भाषेचा’ दर्जा मिळावा म्हणून पत्रव्यवहार करणारा पक्ष पण आमचाच पहिला. हे सगळं सांगायचा उद्देश इतकाच की, आपल्या भाषेसाठी, आपल्या सणांसाठी, आपल्या संस्कृतीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडून इतर एकही पक्ष हिरहिरीने पुढे आला नाही आणि सध्या जी एकूणच जी राजकीय दंगल सुरु आहे, त्यात कोणी येईल अशी शक्यताही वाटत नाही,” अशा शब्दांत राज ठाकरे यांनी राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांवर टीकास्त्र सोडलं आहे.

भारत जोडोच्या यशानंतर काँग्रेस अ‍ॅक्शन मोडमध्ये, दुसरी देशव्यापी यात्रा काढणार,भाजपच्या बालेकिल्ल्यात समारोप

‘आमच्या संघर्षाला तुमची साथ हवी’; नक्की काय म्हणाले राज ठाकरे?

राज ठाकरे यांनी मराठी भाषेसाठी आणखी जोमाने मनसेकडून काम केलं जाणार असल्याचं सांगत नागरिकांनाही साथ देण्याचं आवाहन केलं आहे. “आजच्या दिवशी आपल्या लाडक्या मराठी भाषेच्या गौरव दिनानिमित्त शुभेच्छा देताना या भाषेसाठी आपल्याला सगळ्यांना उभं रहावं लागणार आहे हे भान सोडून चालणार नाही. व्यवहारात मराठी, प्रशासनात मराठी, दूरसंचार माध्यमांमध्ये मराठी, दूरदर्शनच्या समालोचनात मराठी इथपासून ते अभिजात भाषेच्या दर्जासाठी आम्ही संघर्ष केला आणि पुढे देखील करू. मात्र त्यासाठी तुमची आमच्या संघर्षाला साथ हवी तरच हे शक्य आहे. मला माहिती आहे, मनसेकडूनच तुमच्या सगळ्या बाबतीत अपेक्षा असतात, पण या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुमच्या साथीची गरज आहे. आपण ‘मराठी एकत्र’ असू तर ‘सर्वत्र मराठी’ करायला क्षणाचाही विलंब लागणार नाही. मी माझ्या विकास आराखड्यात म्हणलं आहे तसं, मराठी जगाची ज्ञानभाषा व्हावी आणि जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडावा हे आपलं स्वप्न असायला हवं. हे स्वप्न वास्तवात यावं, याच आजच्या दिवसाच्या शुभेच्छा,” असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here