दुसरीकडे, चिंचवडमध्ये पहिल्या दोन तासांत मतदानासाठी निरुत्साह दिसून आला. यावेळी केवळ ३.५२ टक्के मतदानाची नोंद झाली. दुपारी तीननंतर मतदानाची आकडेवारी वाढल्याचे दिसून आले. तीन ते पाच वेळेत सकाळच्या तुलनेत तिप्पट मतदान झाल्याचे स्पष्ट झाले. चिंचवडमध्ये ५०.४७ टक्के मतदान झाले. चिंचवडमध्ये दोन लाख ८७ हजार मतदारांनी आपला हक्क बजावला.
मतदानाला दुपारनंतर वेग
‘कसबा पेठ’च्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागांवर गेल्या महिन्यात निवडणूक जाहीर झाली होती. कसबा पेठेतून भारतीय जनता पक्षाचे हेमंत रासने आणि महाविकास आघाडीचे हेमंत धंगेकर यांच्यात थेट लढत होती. चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात तिरंगी लढत होती. सुट्टीचा दिवस आणि पोटनिवडणुकीत मतदानाकडे पाठ फिरविण्याचा कल या वेळी बदललेला दिसला. अनेक मतदान केंद्रांवर सकाळपासूनच रांगा लागल्या. मतदानानाने दुपारनंतर वेग घेतला. दोन्ही मतदारसंघांत पैसे वाटल्याचे आरोप-प्रत्यारोप, प्रतिस्पर्धी उमेदवारांकडून आचारसंहिता भंगाच्या झालेल्या तक्रारी आणि काही ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये झटापट अशा किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत झाले. या दोन्ही जागा भाजप कायम राखणार, की महाविकास आघाडी धक्का देणार, याचा निर्णय गुरुवारी होणार आहे.
या दोन्ही पोटनिवडणुकांच्या प्रचारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे असे दिग्गज नेते उतरल्याने रंगत निर्माण झाली आहे.
धंगेकर, रासने, ठोंबरे यांच्याविरोधात तक्रारी
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार हेमंत रासने, महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली ठोंबरे या तिघांविरोधात आचारसंहितेचा भंग केल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. धंगेकर यांनी पैसे वाटप केल्याचा आरोप केला आणि त्या आरोपावरून उपोषण केले. त्या उपोषणाबरोबर नागरिकांची जमवाजमव केली. त्यामुळे आचारसंहितेचा त्यांनी भंग केल्याने त्यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली. हेमंत रासने यांनी मतदान केंद्रात भाजपाचे चिन्ह असलेला मफलर गळ्यात घातला होता. त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली ठोंबरे यांनी तक्रार केली. ठोंबरे यांनी मतदान केलेल्या मतदान यंत्राचा फोटो व्हायरल केल्याने त्याबाबत तक्रार करण्यात आली.