जनतेच्या आशीर्वादाचं बळ
भाजपचे आमदार जयकुमार गोरे अपघातानंतर पहिल्यांदा विधिमंडळात हजर राहिले आहेत. महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला त्यांनी उपस्थिती लावली. मोठ्या अपघातातून जनतेच्या आशीर्वादानं पुनर्जीवन मिळालं आहे. आता जनतेच्या प्रश्नावर काम करायचं ठरवलं आहे, असं जयकुमार गोरे म्हणाले. गेल्या अडीच वर्षापासून विकासाची कामं थांबली आहेत. अडीच वर्षापासून भाजपचा आमदार होतो म्हणून महाविकासआघाडी सरकारनं कामं थांबवली होती, असं जयकुमार गोरे म्हणाले. आता आमच्या सरकारनं गेल्या सहा महिन्यांपासून चांगले निर्णय घेतले आहेत. मतदारसंघातील पाण्याचे प्रश्न मार्गी लागतील, असं जयकुमार गोरे म्हणाले.
डॉक्टरांचा विश्रांतीचा सल्ला,मतदारसंघाचे प्रश्न महत्त्वाचे
जयकुमार गोरे यांचा २४ डिसेंबरला पहाटे अपघात झाला होता. अपघातानंतर उपचार घेऊन जयकुमार गोरे मतदारसंघात विविध कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. आज ते अर्थसंकल्पीय विधिमंडळ अधिवेशनाला उपस्थित राहिले आहेत. जयकुमार गोरे यांनी डॉक्टरांचा विश्रांतीचा सल्ला दिला आहे, असं सांगितलं. पण, मतदारसंघाचे प्रश्न आहेत, विधिमंडळ अधिवेशन पुन्हा नसतं, त्यामुळं विधिमंडळात हजेरी लावणं आवश्यक असल्याचं जयकुमार गोरे म्हणाले.
जयकुमार गोरे हे माण खटाव विधानसभा मतदारसंघाचं तिसऱ्यांदा प्रतिनिधीत्व करत आहेत. जयकुमार गोरे यांनी राजकीय कारकीर्द जिल्हा परिषद सदस्य म्हणून सुरु केली होती. त्यानंतर ते आमदार म्हणून अपक्ष नंतर काँग्रेस आणि आता भाजपमधून माण खटावचं प्रतिनिधित्व करत आहेत.