जळगाव : कामानिमित्ताने महामार्गावरून जात असताना दुचाकी घसरल्याने झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणीचा मृत्यू झाला आहे. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयात तब्बल चार दिवस या तरुणीची मृत्यूशी झुंज सुरू होती. मात्र ही झुंज अपयशी ठरली असून उपचार सुरू असताना शनिवारी रात्री या तरुणीचा मृत्यू झाला. पूनम सुनील विसपुते (वय. २७, रा.आशाबाबानगर) असं मृत तरुणीचं नाव आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील आशाबाबा नगर येथे पूनम विसपूते ही तरूणी आपल्या परिवारासह वास्तव्याला होती. पूनम ही शहरातील एका खासगी जीममध्ये सेल्स मॅनेजर म्हणून कामाला होती. शहरातील महामार्गालगत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून गेल्या काही दिवसांपासून दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आलं आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसमोर खोदकाम करण्यात आलं असून, याच खोदकामाच्या ठिकाणी मंगळवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास पूनम दुचाकीने जात असताना तिची दुचाकी घसरुन अपघात झाला होता.

विज्ञानाच्या शिक्षकानं लॅबमध्ये नेलं, आमच्यासोबत नको ते केलं; दोन मुलांनी सांगितली आपबिती

या अपघातात पूनम गंभीर जखमी झाली होती. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. याचदरम्यान पूनम हिचा जीममधील सहकारी लोकेश बारसे या ठिकाणाहून जात होता. तरुणीचा अपघात झाल्याने घटनास्थळी गर्दी झाल्याचे त्याला दिसले. त्यानंतर लोकेशने चौकशी केल्यावर जखमी तरुणी ही तो काम करत असलेल्या जीममधील सेल्स मॅनेजर असल्याने लोकेशने पूनम हिला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल केले होते.

उपचाराच्या आर्थिक मदतीसाठी सोशल मीडियावर केले होते आवाहन

पूनम हिची घरची परिस्थिती हालाखीची आहे. पूनमचे वडील सुनील विसपुते हे सुरक्षारक्षक म्हणून काम करतात, तर भाऊ हितेश हा एका कुरिअर कंपनीत कामाला आहे. डोक्याला दुखापत असल्याने तिच्या उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर पैशांची आवश्यकता होती. यासाठी पूनमच्या मित्र परिवारासह इतरांकडून सोशल मीडियावर पूनम हिला उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले होते.

एकीकडे आर्थिक मदत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असताना, दुसरीकडे पूनम हिची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली. शनिवारी रात्री उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पूनमच्या अपघाती मृत्युमुळे कुटुंबासह तिच्या मित्र परिवाराला धक्का बसला आहे. पूनमच्या कुटुंबियांचा रुग्णालयातील आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. मृत पूनमच्या पश्चात वडील, भाऊ आणि मोठी बहिण असा परिवार आहे. या घटनेबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल तुषार जावरे करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here