अहमदनगर : संगमनेर तालुक्यातील साकुर शिवारात भगवान पेट्रोलियम या इंडीयन ऑईल कंपनीच्या पेट्रोल पंपावर एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत चेहऱ्यावर रुमाल बांधून आलेल्या तिघांनी अडीच लाखांची लूट करुन पसार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडीस आला आहे. काल रविवारी रात्री १० वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. याबाबत अज्ञात तिघांविरोधात घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पेट्रोल पंपावरील कर्मचारी सुनिल हरिभाऊ गिरे (वय २८, रा. हिवरगाव पठार, संगमनेर, जि. अहमदनगर) यांनी घारगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, “मी सुमारे एक वर्षापासून साकूर ते मांडवे रोड लगत असणारे भगवान पेट्रोलियम पंपावर सेल्समन म्हणून नोकरीस आहे. २६ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:४५ वाजेच्या सुमारास मी तसेच माझा सहकारी विलास भाऊसाहेब कातोरे असे आम्ही दोघे ड्युटीवर होतो. दिवसभर आम्ही पेट्रोल तसेच डिझेल, ऑईल विक्री झालेल्या पैशांचा हिशोब रात्री करत होतो”.

देवीच्या मूर्तीवर डाग, हातही खंडीत,अंबाबाईच्या मूर्तीला सौंदर्य बाधा; वज्रलेप ठरतोय घातक?

“त्यावेळी पेट्रोल पंपावर दोन दुचाकी पेट्रोल भरण्याकरता आल्याने माझा सहकारी विलास कातोरे हा कॅबिनमधून पेट्रोल भरण्यासाठी बाहेर गेला. मी केबिनमधील पैसे टेबलावर मोजत होतो. त्यावेळी त्या दोन दुचाकीवरील तीन अनोळखी इसम पेट्रोलचे पैसे न देताच पंपाच्या केबिनकडे आले. त्यातील दोघांनी लाल रंगाचे जॅकीट घातलेले होते. दोघांपैकी एकाचे वय अंदाजे २० ते २५ वर्ष होते. वयाचा मध्यम शरीर यष्टीचा होता. दुसरा २२ ते २५ वयाचा सडपातळ व अंदाजे पाच फुट उंचीचा होता. त्याच्या हातामध्ये गन होती”.

“तिसरा व्यक्ती पिवळ्या रंगाचे जॅकीट घातलेला साडे पाच फुट उंचीचा सडपातळ वय अंदाजे २८ ते ३० असलेला आणि तिघांनीही तोंडाला काळ्या कापडांनी बांधलेले होते. तिघेजण केबिनमध्ये आले त्यावेळी मी दिवसभराची पेट्रोल-डिझेल ऑईल विक्री झालेले पैसे टेबलावर मोजत होतो. यातील एकाने मला तसेच माझा मित्र विलास कातोरे यास गनचा धाक दाखवून “तुमच्याकडे जेवढे पैसे आहेत तेवढे काढून या. नाहीतर तुम्हा दोघांना गोळी घालून मारून टाकीन”, असं सांगत धमकी दिली.

“आम्ही दोघे घाबरलो त्यावेळी दुसऱ्याने टेबलच्या ड्रॉव्हरमध्ये ठेवलेली पैशांची काळ्या रंगाची पिशवी काढून घेतली. एका लाल रंगाचे जॅकीट घातलेल्या इसमाने मी मोजत असलेले पैसे माझ्या हातातून हिसकावून घेतले. आम्ही दोघे बाबरून गेल्याने आम्ही त्यांना कुठल्याही प्रकारे प्रतिकार केला नाही. ते पैसे घेऊन त्यांच्या दुचाकीवरुन मांडवे गाावच्या दिशेने निघून गेले. त्यांच्यापैकी एका दुचाकीचा नंबर एमएच १७ सीए ७२०७ असे असल्याचे पाहिले आणि ते निघून गेले”. याबाबत घारगाव पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास घारगाव पोलीस करत आहेत.

शेतकऱ्याच्या नशिबी दु:खच, शासकीय खरेदीसाठी धडपड पण पोलिसांकडून लाठीचार्ज, मायबाप सरकार लक्ष घाला…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here