एका वृत्तवाहिनीशी चर्चा करताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधकांवर खरपूस टीका करतानाच ऑपरेशन लोटसची खिल्लीही उडवली. ऑपरेशन लोटसबिटस काही नसतं. आमचे हातही अनेक ऑपरेशन करून तयार झाले आहेत. आमचेही ऑपरेशन थिएटर आहे. आम्ही नाजूक हाताने सर्वात जास्त चिरफाड करू शकतो. १०५ आमदार असूनही सत्ता आली नाही, याचा धक्का विरोधकांना बसला आहे. हा भूकंपाचा धक्का आहे. त्यामुळे त्यांना दिवसाढवळ्याही सत्तेची स्वप्न पडत असतात. त्यातूनच आमदार संपर्कात असल्याच्या वावड्या ते उठवत असतात. जगातील सर्वच विरोधी पक्ष असे हातखंडे वापरत असतो. त्यात नवीन काही नाही. आम्ही मात्र त्याकडे मनोरंजन म्हणून पाहत असतो, असा टोला राऊत यांनी भाजपला नाव न घेता लगावला.
सध्या महाराष्ट्रात विरोधकांकडून मनोरंजन सुरू आहे. सत्ताधाऱ्यांनी हे मनोरंजन बघितलं पाहिजे. त्यामुळे कामाचा ताण कमी होतो. त्यामुळे सरकारची प्रकृतीही उत्तम राहिल, असे चिमटे काढतानाच विरोधकांना समुपदेशनाची गरज आहे. मनोविकर तज्ज्ञांकडून त्यांनी समुपदेशन घ्यावं. वैद्यकीय मंत्री अमित देशमुख यांनी त्यात लक्ष घालावं. मनोरंजन करणाऱ्यांना रॉयल्टी द्यावी. मासिक बिदागी सुरू करावी. तसा प्रस्ताव देशमुख यांनी आणावा. विरोधी पक्षात कुणाकुणाला समुपदेशनाची गरज आहे. त्याचा अहवाल वैद्यकीय मंत्र्याने मुख्यमंत्र्यांना दिला पाहिजे, असा खोचक टोलाही राऊत यांनी लगावला. सत्ता आल्यानंतर मी सत्तेच्या आसपासही फिरकलो नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना सोडून मी कुणालाही भेटलो नाही. त्यामुळे मला शांत झोप लागण्याचा प्रश्नच येत नाही, असं सांगताना मंत्रिमंडळ विस्तारामुळे आता महाराष्ट्राला शांत झोप लागेल. लोकांच्या समस्या सुटतील, असंही ते म्हणाले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times