Maharashtra Politics | अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी प्रथेप्रमाणे बहिष्कार टाकला होता. यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये महाराष्ट्रद्रोही Vs देशद्रोही असा वाद रंगला होता.

हायलाइट्स:
- मुख्यमंत्री फक्त नावाला खुर्चीवर आहेत
- कारभाराची सूत्रे दिल्लीतून हलत आहेत
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला होता. यावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. या सगळ्याचा उल्लेख ‘सामना’च्या अग्रलेखात करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ते चहापानाला आले नाहीत ते बरे झाले. त्यांचे मंत्री जेलमध्ये गेले, ज्यांनी देशद्रोह केला, त्यांच्यासोबत चहा पिणे टळले, ते बरे झाले, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. त्यावर ‘सामना’तून सडकून टीका करण्यात आली आहे. विरोधकांना देशद्रोही ठरवणे ही भाजपची परंपरा आहे. मिंधे गटाच्या आमदारांनी आणि त्यांच्या मुख्य नेत्याने भाजपचा बाप्तिस्मा घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. विद्यमान मुख्यमंत्र्यांचा अभ्यास कच्चा आहे व ते ज्यांच्या सावलीत वावरत आहेत ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वकिलीची डिग्री असली तरी ते महाराष्ट्रद्रोह्यांची वकिली करण्यात धन्यता मानतात. महाराष्ट्राला लाचार करण्याचे प्रयत्न दिल्लीतून सुरु आहेत. मुंबई-महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प गुजरातेत पळवले व मुख्यमंत्री त्यावर गप्पच बसले. ही महाराष्ट्राशी बेईमानी ठरते, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.
केंद्रीय यंत्रणांचे मालक दिल्लीत असताना फडणवीस-महाजनांना कोण हात लावणार?
महाविकास आघाडी सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांना अटक करण्याची योजना आखण्यात आली होती, असा आरोप भाजपच्या नेत्यांकडून सातत्याने केला जात आहे. याबाबत ‘सामना’तून भाष्य करण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांना जेलमध्ये पाठविण्याची योजना होती, असा भिजका लवंगी ‘स्फोट’ मुख्यमंत्र्यांनी करून लाचारीचे टोकच गाठले. वास्तविक ‘ईडी सीबीआय’कडून चौकश्या व अटकेचे भय होते म्हणूनच आपण कसे पळून गेलो, त्या पलायनाची सुरस कथा त्यांनी सांगायला हवी. अटकेच्या सुपाऱ्या केंद्रीय तपास यंत्रणा घेत आहेत व देशभरातील विरोधकांना अटक केली जात आहे. त्या यंत्रणांचे मालक दिल्लीत बसले असताना फडणवीस- महाजनांना कोण हात लावणार? उलट महाराष्ट्रात याआधी असलेल्या महाविकास आघाडी सरकारने ‘विक्रांत’ घोटाळयापासून अनेक भ्रष्ट प्रकरणांच्या चौकश्या लावताच यांच्या पाटलोणी भिजून गेल्या व सत्तांतर होताच या सगळया भ्रष्टाचारयांना ‘क्लीन चिट देऊन मोठीच देशसेवा फडणवीस शिंदे सरकारने केली, असा टोला ‘सामना’च्या अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.