भरधाव कार क्र. एम.एच ३७ जी ९८८९ ने दुभाजकावरुन दुसऱ्या बाजूने समोरून येणाऱ्या आयशर क्र.एम.एच.१३ सी.यु.४६४४ ला जोरदार धडक दिली. या आयशरच्या पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या कारची आयशरला धडक बसली. या अपघातात कार आणि आयशर दोन्हीही रस्त्याखाली गेले.
मागून येणारी कार आय ट्वेंटी होती. या गाडीतील अमित विठ्ठल घुगे वय २९ रा. तरोडा आणि आयशरमधील रामा प्रल्हाद डोंगरे वय ५० रा. इंचगाव ता. मोहोळ जि.सोलापूर यांचं जागीच निधन झालं. या भीषण अपघाताची माहिती मिळताच जखमींना नांदेड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
स्वप्निल शिवाजी पाटील, अभिजीत शिरफुले, साईनाथ मुळे रा. नाईक नगर नांदेड हे गंभीर जखमी झाले आहेत. तर नजमा बेगम, सय्यद अहमद, नाहीद बेगम, जावेद सय्यद, सय्यद अयान रा. सर्व बरकतपुरा माळटेकडी रोड नांदेड हे किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.
महामार्गांवर अपघातांचं प्रमाण सतत वाढतं आहे. अतिवेगामुळे अपघाताचं प्रमाण वाढल्याचं चित्र आहे. दुभाजकाच्या दुसऱ्या बाजूने येणाऱ्या आयशर ट्रकला दिलेल्या धडकेत कारचा चक्काचूर झाला आहे. समोरुन येणारा आयशर ट्रक आणि कारची धडक इतकी भीषण होती की या अपघातात संपूर्ण कारचा चुराडा झाला आहे. तसंच या कारमधील तिघं गंभीर जखमी असून त्यांची मृत्यूशी झुंज सुरू आहे.