भारतातील परिधान किरकोळ कंपनी फॅबइंडियाने त्यांची आयपीओ योजना थांबवली आहे. शेअर बाजारात सध्या सुरू असलेले चढ-उतार पाहता कंपनीने आयपीओमधून माघार घेण्याची घोषणा केली आहे. या आयपीओद्वारे फॅबइंडियाला ४००० कोटी रुपये उभे करायचे होते. मात्र, भारतीय बाजारातील उलथापालथ पाहता कंपनीने सध्या आयपीओ न आणण्याचा निर्णय घेतला आहे.
कंपनीने काय म्हटले?
सध्याच्या बाजारातील परिस्थिती आयपीओसाठी अनुकूल नसल्याने आयपीओ मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे फॅबइंडियाने एका निवेदनात म्हटले आहे. फॅबइंडियाच्या सूचीबद्ध प्रतिस्पर्ध्यांमध्ये वेदांत फॅशन, आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल आणि अरविंद फॅशन यांचा समावेश आहे. या कंपन्यांच्या शेअर्समध्ये यावर्षी आतापर्यंत १४-२१ टक्के घसरण झाली आहे.
भांडवलासाठी इतर पर्यायांचा विचार
या आयपीओअंतर्गत ५०० कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी करण्याची योजना होती. त्याच वेळी विद्यमान भागधारकांकडून २.५१ कोटी शेअर्स विकले जाणार होते. कंपनीला हा निधी कर्जाची परतफेड आणि नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर रिडीम करण्यासाठी वापरायचा होता. कंपनीने सांगितले की, आयपीओ माघारी घेतल्याल्यानंतर फॅबइंडिया आता भांडवलासाठी इतर पर्यायांचा विचार करू शकते. कंपनी भविष्यात पुन्हा आयपीओ आणण्याचा विचार करू शकते. मात्र, हे भांडवलाची आवश्यकता आणि बाजाराच्या परिस्थितीवर अवलंबून असेल.
या कंपन्यांचीही माघार
शेअर बाजारात सध्या सुरू असलेल्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर आणखी काही कंपन्यांनीही आयपीओमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी, ज्वेलरी किरकोळ विक्रेते Joyalukkas, ई-कॉमर्स फर्म स्नॅपडिल आणि वेअरेबल इलेक्ट्रॉनिक्स कंपनी बोट (boAt) यांनीही त्यांचे आयपीओ मागे घेतले आहेत.