काही दिवसांपूर्वीच केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला बहाल केले होते. त्यामुळे आता शिंद गट हाच अधिकृत शिवसेना पक्ष झाला आहे. त्यामुळे या नव्या शिवसेनेकडून ठाकरे गटाच्या ताब्यात असलेल्या शाखा आणि कार्यालये ताब्यात घेतली जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. परंतु, न्यायालयाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्यास नकार दिला. त्यामुळे शिंदे गटाकडून शिवसेनेशी संबंधित मालमत्ता ताब्यात घेतल्या जाऊ शकतात. शिवसेनेच्या आणि ठाकरेंच्या आतपर्यंतच्या राजकीय वाटचालीत शाखांचे महत्त्व अनन्यसाधारण राहिले आहे. याच शाखांच्या माध्यमातून शिवसेना कार्यकर्त्यांचे मोठे जाळे तयार झाले आहे. मुंबईत शिवसेना पक्ष तळागाळात रुजण्यात शाखांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. या शाखांकडे स्थानिक राजकारणाचे केंद्र म्हणून पाहिले जाते. त्यामुळे या शाखा शिंदे गटाच्या ताब्यात गेल्यास ठाकरेंची मोठी अडचण होण्याची शक्यता आहे.
ठाकरेंचे मुंबईतील वर्चस्व मोडून काढायचे झाल्यास शिवसेना शाखा महत्त्वाच्या
गेल्या सहा महिन्यांच्या काळात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या अनेक आमदार, खासदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना गळाला लावले. मात्र, यानंतरही ठाकरेंची मुंबईतील ताकद अबाधित असल्याचे दिसत आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मुंबईत १२ ते १३ शाखाप्रमुख वगळता फारजण शिंदे गटात गेले नव्हते. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे गट याच निष्ठावंत आणि शाखांच्या जोरावर शिंदे-फडणवीसांसमोर आव्हान उभे करु शकतो. त्यामुळे येत्या काळात शिंदे गटाकडून शिवसेनेच्या सर्व शाखांवर ताबा मिळवण्याचे प्रयत्न होऊ शकतात. मोठा संघर्ष टाळण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडून हळूहळू आणि टप्याटप्प्याने शिवसेनेच्या शाखांवर कब्जा केला जाऊ शकतो.