देवदत्त कामत यांच्या युक्तिवादातील प्रमुख मुद्दे
ठाकरेंच्या बाजूनं युक्तिवाद करताना देवदत्त कामत यांनी विधानसभा अध्यक्ष विधिमंडळ पक्षाच्या आदेशानं वागू शकत नाहीत, असं म्हटलं. पक्ष प्रतोद निवडीचा निर्णय त्यांची निवड ३ जुलैला झाल्यानंतर घेण्यात आला आहे. शिंदे गटाकडून सुनील प्रभू यांना हटवून भरत गोगावले यांची प्रतोद पदी नियुक्ती करण्यात आली. मात्र, त्यासाठी विधानसभा अध्यक्षांना २१ जूनच्या ठरावाचं २२ जूनचं पत्र देण्यात आलं. ते पत्र पक्षाच्यावतीनं देण्यात आलेलं नव्हतं. तर ते फक्त विधिमंडळ पक्षाच्यावतीनं देण्यात आलं होतं.
व्हीप कोण असेल हा निर्णय विधिमंडळाचा नसून तो पक्षाचा आहे. व्हीप निवडीमध्ये प्रक्रियात्मक अनियमितता नसून घटनात्मक बेकायदेशीरपणा असल्याचा युक्तिवाद देवदत्त कामत यांनी केला.
शिवसेनेच्या पक्षाची रचना ही २०१८ मध्ये करण्यात आली होती. शिवसेनेच्या पक्षप्रमुखपदी उद्धव ठाकरे यांची नेमणूक करण्यात आली होती, असं देवदत्त कामत म्हणाले.
शिंदे गटाच्या आमदारांकडून पक्षांतर बंदी कायद्यातून वाचण्यासाठी आम्हीच पक्ष असल्याचा दावा करण्यात येत आहेत. आता निवडणूक आयोगानं देखील त्यांना चिन्ह आणि पक्ष दिलं आहे. मात्र, निवडणूक आयोगाचा निकाल हा पूर्वलक्षी प्रभावानं लागू होऊ शकत नाही, असंही देवदत्त कामत म्हणले.
घटनापीठापुढील युक्तिवाद गुरुवारी संपणार
दरम्यान, सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी गुरुवारी दुपारपर्यंत शिंदेंच्या वकिलांना युक्तिवाद संपवण्याबाबत सूचना केल्या. त्यानंतर कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी हे त्यांची बाजू पुन्हा मांडणार आहेत. आता, शिंदे यांच्याकडून निरज किशन कौल युक्तिवाद करत आहेत.