शेगाव येथील आनंद पलडीवाल यांच्या घरी १५ जानेवारीच्या रात्री चोरी झाली होती. आतापर्यंतची जिल्ह्यातील ही सर्वात मोठी चोरी होती, असे म्हटले जात आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या चोरीचा तपास करण्याचे मोठे आवाहन जिल्हा पोलिसांसमोर होते. जिल्हा पोलीस अधीक्षक, दोन अप्पर पोलीस अधीक्षक, आणि खामगाव पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे, शेगाव शहर पोलीस स्टेशन ठाणेदार अनिल गोपाळ यांच्या मार्गदर्शनात कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचे विशेष पथक नेमण्यात आले होते. याशिवाय सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणासाठीही सायबर शाखेचे पदक नेमण्यात आले होते.
सायबर शाखेकडून मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे मेहकर तालुक्यातील सोनाटी येथील वैभव नंदू मानवतकर (वय २६) याला नाशिक येथून ताब्यात घेण्यात आले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्हेची कबुली दिली. त्यातून त्याच्या इतर दहा साथीदारांची नावे समोर आली. त्यानंतर पोलिसांनी एकेक करत सगळ्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या. ११ पैकी सात आरोपी हे गुन्हेगार असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यातील अनेकांवर राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये खून दरोड्यासारखे गुन्हे दाखल आहेत. वैभव नंदू मानवतकर (रा. सोनाटी, तालुका मेहकर), मुंजा तुकाराम कहाते, (वय २०), प्रीतम अमृतराव देशमुख (वय २९) दोघे राहणार पिंपरी देशमुख, जिल्हा परभणी, अजिंक्य दिगंबर जगताप (वय २७, राहणार पुंगळा, जिल्हा परभणी), नवनाथ विठ्ठल शिंदे (वय १९ राहणार गंगाखेड, जिल्हा परभणी), कैलास लक्ष्मण सोनार (वय २४, राहणार जेल रोड नाशिक), मयूर राजू ढगे (वय २२, राहणार निफाड, नाशिक), सौरभ राजू ढगे (वय २६, राहणार निफाड, नाशिक), सुजित अशोक साबळे (वय २७, राहणार खडक, मालेगाव तालुका, नाशिक), प्रवीण दीपक गांगुर्डे (वय २८ राहणार सातपूर, नाशिक), पूजा प्रवीण गांगुर्डे (वय २९, राहणार सातपूर नाशिक) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
आरोपींमध्ये सख्खे भाऊ आणि एक जोडपे
आरोपींमध्ये नाशिकच्या निफाडचे असलेले सूरज आणि मयुर ढगे हे दोघे सख्खे भाऊ आहेत. तर प्रवीण गांगुर्डे आणि पूजा गांगुर्डे हे पती-पत्नी आहेत. विशेष म्हणजे सर्व आरोपी हे तिशीच्या आतले आहेत.