बीडच्या धारूर पंचायत समितीच्या मुजोर अभियंत्याने गुंडालाही लाजवेल अशी धमकी दिली आहे. “जो येईल त्याला जेसीबीच्या खोऱ्याखाली घ्या”, अशी धमकी त्यांनी दिली आहे. रस्त्याचे काम चांगले करा म्हणण्यासाठी गेलेल्या गावकऱ्यांना त्यांनी ही धमकी दिली असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी अभियंत्याकडे पिस्तूलचा धाक दाखवल्याची तक्रारही गावकऱ्यांनी केली आहे.
“जेसीबीच्या खोऱ्याखाली घे, त्यांना पुरून टाक”, अशी धमकी गावकऱ्यांना देणाऱ्या शासकीय अभियंत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बीडमधील या मुजोर अभियंताच्या धमकीमुळे गावकरी दहशतीखाली आहेत. एखाद्या टपोऱ्या गुंडालाही लाजवेल, अशी धमकी चक्क धारूर पंचायत समितीच्या अभियंत्याने दिली आहे. धारूर पंचायत समितीच्या वतीने जहागीर मोहा या गावात धनगर वस्ती रोडवर खडीकरणाचे काम सुरू आहे. रस्त्याचे काम चांगले करावे, अशी मागणी करण्यासाठी गावकरी गेले असता त्यांची समजूत काढण्याऐवजी मुजोर अभियंत्याने ग्रामस्थांना धमकी दिली.
सय्यद मुजाहिद, असे या मुजोर अभियंत्याचे नाव आहे. त्याच्या विरोधात गावकऱ्यांनी धारूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. विशेष म्हणजे तक्रारीत अभियंत्याकडे पिस्तूल असून पिस्तुलीचा धाक देखील दाखवत असल्याचे म्हटले आहे.