‘भुपालपल्लीमध्ये तरुणीनं आत्महत्या केली. तिच्या पालकांनी २२ फेब्रुवारीला बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. त्यानंतर तरुणी दुसऱ्याच दिवशी घरी परतली. वर्गमित्र लहानपणीचे फोटो शेअर करत असल्याचं तिनं पालकांना सांगितलं. यानंतर तिनं गळफास लावून आत्महत्या केली,’ असा घटनाक्रम भुपालपल्लीचे डीएसपी ए. रामुलू यांनी सांगितला.
छळ होत असल्यानं मुलीनं आत्महत्या केल्याचा दावा मृत तरुणीच्या पालकांनी केला. या प्रकरणी पोलिसांनी अलोक्या, राहुल आणि यशवंत नावाच्या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ‘शाळेचे मित्र लहानपणीचे फोटो शेअर करून अपमानास्पद वागणूक देत असल्याचं तरुणीनं सांगितलं होतं. अलोक्या, राहुल आणि यशवंतनं हे फोटो शेअर केल्याचं तरुणी म्हणाली होती. पोलिसांनी गुन्हा नोंदवून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे,’ अशी माहिती डीएसपींनी दिली.
गेल्या आठवड्यातही वारंगलमध्ये अशीच काहीशी घटना घडली होती. सरकारी वैद्यकीय रुग्णालयात पदवीच्या पहिल्या वर्षात शिकत असलेल्या तरुणीनं सीनियरच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला. रुग्णालयात एक डॉक्टर तिला सातत्यानं त्रास देत होता. तरुणीनं त्याची तक्रार केली. मात्र कारवाई झाली नाही. त्यामुळे तिनं आत्महत्येचा प्रयत्न केला. रविवारी रात्री उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.