कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणूक ही अत्यंत चुरशीची मानली जात होती. यात धंगेकर बाजी मारणार की रासने भाजपचा कसब्याचा गड राखणार याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला आहे. मात्र मतमोजणीपूर्वीच एक एक्झिट पोल व्हायरल झाला असून यामध्ये रवींद्र धंगेकर सरळ बाजी मारताना दिसत आहेत.
शहरात आज स्ट्रेलीमा या संस्थेचा एक्झिट पोल व्हायरल झाला आहे. या एक्झिट पोलमध्ये भाजपला कसब्यामध्ये जोरदार धक्का मिळणार असल्याचे दिसत असून रवींद्र धंगेकर या ठिकाणी मोठा विजय साकारताना दिसत आहेत. या एक्झिट पोलनुसार भाजपच्या हेमंत रासने यांना ५९ हजार ३५१ इतकी मतं मिळणार असून रवींद्र धंगेकर यांना ७४ हजार ४२७ इतकी मतं मिळताना दिसत आहेत. त्यामुळे कसब्यातील अटीतटीच्या लढतीत रवींद्र धंगेकर हे १५ हजार ७७ इतक्या मताधिक्यांनी विजय होतील, असा अंदाज या एक्झिट पोलमधून वर्तविण्यात आलाय.
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात ५०.०६ इतकं मतदान झालं आहे. ही पोटनिवडणूक महाविकास आघाडी आणि भाजपने अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. भाजपकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पाच ते सात मंत्री पुण्यामध्ये तळ ठोकून होते. त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील शेवटचे सहा दिवस पुण्यामध्ये तळ ठोकून होते. दुसरीकडे महाविकास आघाडीचे सुद्धा बडे नेते रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी पुण्यामध्ये आले होते. त्यामुळे कसब्यात रवींद्र धंगेकर बाजी मारणार की हेमंत रासने भाजपचा ३० वर्षांपासूनचा बालेकिल्ला असणारा कसब्याचा गड राखणार? याकडे पुणेच नव्हे तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते.
आता स्ट्रेलीमा या संस्थेचा एक्झिट पोल व्हायरल झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे. मात्र खरं चित्र हे २ मार्च रोजी मतमोजणी नंतरच स्पष्ट होणार आहे. या एक्झिट पोलवर रवींद्र धंगेकर यांनी महाराष्ट्र टाईम ऑनलाईनशी बोलताना म्हटलं की, ‘कसबा हा कोणत्याही पक्षाचा गड नाही, तर तो जनतेचा गड आहे. कितीही यंत्रणेचा गैरवापर केला तरीही निवडणूक जनतेने हातात घेतली होती. या एक्झिट पोलपेक्षाही जास्त मताधिक्य मला मिळेल’, असा विश्वास रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केलाय.