सोलापूर : सोलापूर जिल्हा न्यायालयाने सोमवारी महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. तीन जणांनी एकत्र येत एका अविवाहित तरुणाचा गुप्तांग कापून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. सोलापूर जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश शब्बीर औटी यांनी तिघा आरोपींना तीस वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व प्रत्येकी दहा लाख रुपये प्रमाणे तीस लाखांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

हुसेनी नबीलाल जेऊरे (वय २३ वर्ष, रा. करजगी, ता अक्कलकोट, जि सोलापूर), अ हमीद उर्फ अमीर नजीर मुल्ला (रा. मड्डी तडवळगा, ता इंडी, जि. विजयपूर ,कर्नाटक), खदीरसाब उर्फ मुन्ना चांदसाहेब पटेल (रा. तडवळगा, ता इंडी, जि विजयपूर, कर्नाटक) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पीडित व्यक्ती हा तिघा आरोपींचा मित्रच आहे. १७ नोव्हेंबर २०२१ रोजी रात्री सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील कडबगाव येथे ही घटना घडली होती. यातील मुख्य आरोपी हुसेनी जेऊरे असून आपल्या पत्नीसोबत पीडित तरुणाचे अनैतिक संबंध असल्याचा त्याला संशय होता. या कारणावरुन त्याने मित्राला जेवायला जाऊ असे सांगत सोलापुरात आणले आणि मारहाण करून त्याचे गुप्तांग कापले होते.

पीडित तरुण, हुसेनी जेऊरे, खदीरसाब पटेल, अ. हमीद मुल्ला हे सर्व मित्र आहेत. चौघे रिक्षा ड्रायव्हरचे काम करत होते. पीडित मित्राचे हुसेनी जेऊरे याच्या घरी येणेजाणे होते. हुसेनी जेऊरे हा विवाहित होता. तो नेहमी पत्नीवर संशय घेत होता. पत्नी व मित्राचे अनैतिक संबंध आहेत, यावरून तो मित्रावर चिडून होता. अखेर त्याने कट रचला.

खदीरसाब पटेल आणि अ. हमीद मुल्ला यांना सोबत घेऊन मित्राची हत्या करण्याचा प्लॅन केला. १७ नोव्हेंबर २०२१ रोजी रात्री पीडित मित्राला जेवायला जायचे आहे, असे सांगून ते एका धाब्यावर घेऊन गेले. जेवण करून झाल्यावर एक रिक्षा बंद पडली आहे, असे सांगून त्याला दक्षिण सोलापूर तालुका हद्दीतील कडबगाव हद्दीत आणले. रात्रीच्या अंधारात त्याला मारहाण करत, हुसेनी जेऊरे याने ब्लेडने मित्राचे गुप्तांग कापून बाजूला फेकले.

सोबत असलेल्या दोघांनी हातपाय धरले होते. गुप्तांग कापल्यानंतर, अतिरक्तस्राव झाला. त्यावेळी जखमी झालेल्या तरुणाला बेशुद्ध अवस्थेत सोडून तिघांनी घटनास्थळवरून पळ काढला. १८ नोव्हेंबर रोजी सकाळी रस्त्यावर पडलेल्या तरुणाला पाहून नागरिकांनी अक्कलकोट पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली, जखमी तरुण व त्याचे गुप्तांग घेऊन रुग्णालयात उपचारासाठी अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तरुणाला वाचवले पण गुप्तांग जोडण्यात यश आले नाही.

अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अविवाहित तरुणावर उपचार सुरू असताना, फिर्याद जबाब नोंद करून तीन आरोपींना अटक केले. पोलीस निरीक्षक बेरड यांनी सर्व तपास करून दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले. सदर खटल्यात एकूण 14 साक्षीदार तपासण्यात आले. पीडित फिर्यादी मित्र, पोलीस पाटील, डॉक्टर व तपास अधिकारी यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली.

नादुरुस्त बॉयलर बेल्ट अचानक सुरु, कामगार आत ओढला गेला, पट्ट्यात अडकून जीव गमावला
पीडित फिर्यादीने दिलेली साक्ष व जबाब हे घटनेशी सुसंगत दिसून आले. जिल्हा न्यायालयाने पीडित फिर्यादीची साक्ष महत्वपूर्ण हे नमूद करत ग्राह्य धरली. सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरला. तसेच ही घटना दुर्मिळातील दुर्मिळ असून पीडित अविवाहित तरुणाचे गुप्तांग कापून त्याचे आयुष्यभरातील अपरिमित नुकसान केले आहे अशी नोंद करून जिल्हा न्यायालयाने तिन्ही आरोपींना ३० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. तसेच पीडित अविवाहित तरुणाला प्रत्येकी दहा लाख रुपये प्रमाणे ३० लाख रुपये देण्याचा आदेश दिला आहे.

मनोजकाकाने अत्याचार केला, मुलीचा दावा; आरोपी म्हणतो मग २ महिन्यांनी माझ्या लग्नाला का आलीस?
पंधरा दिवसांत सुनावणी पूर्ण करुन निकाल

सदर खटल्याचा लवकरात लवकर निर्णय व्हावा या दृष्टीने अन्य न्यायालयातून हा खटला जिल्हा न्यायालयात १३ फेब्रुवारी २०२३ रोजी वर्ग करण्यात आला होता. जिल्हा न्यायाधीश यांनी पंधरा दिवसांत सर्व साक्षीदार तपासून, पीडित तरुणाची साक्ष ग्राह्य धरून २८ फेब्रुवारी २०२३ रोजी निकाल दिला आहे. या खटल्यात सरकारतर्फ अॅड माधुरी देशपांडे, अॅड नागनाथ बि. गुंडे, मूळ फिर्यादीचे वकील अॅड हुसेन बागवान, आरोपी तर्फे अॅड रियाज शेख यांनी काम पाहिले.

बिघडाबाबत निर्णय घ्या, ३०० लिटर दूध रस्त्यावर फेकत वैतागलेल्या शेतकऱ्याने रिक्षाच पेटवली!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here