याशिवाय वरिष्ठ पत्रकार नितीन चौधरी यांनी सांगितले की, “राहुल कलाटे यांची उमेदवारी नाना काटे यांना त्रासदायक ठरू शकते. वंचितचीही मतं मोठ्या प्रमाणात कलाटे यांना मिळू शकतात. शिवाय कलाटे यांचं मोठं राजकीय वजन चिंचवडमध्ये आहे. जगतापांना भिडणारा माणूस म्हणून त्यांची ओळख आहे. गेल्या निवडणुकीत त्यांची मतं पाहून अनेकांच्या तोंडाला फेस आला होता. सध्याच्या परिस्थितीत नाना काटे यांना मिळणारी मतं कलाटे खाऊ शकतात, ज्याचा थेट फायदा अश्विनी जगतापांना होऊ शकतो. शिवाय भाजप पदाधिकाऱ्यांनी देखील जीव तोडून काम केलेले आहे. त्यामुळे भाजपला त्याचा फायदा नक्कीच होईल.
ज्येष्ठ पत्रकार श्याम दौंडकर यांनी सांगितले की, राहुल कलाटे यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारीची इच्छा असताना देखील ऐनवेळी नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे राहुल कालाटे अपक्ष उभे राहिले. ते शिवसैनिक असल्याने त्यांना मूळच्या शिवसैनिकांची मते आणि वंचितने दिलेला पाठिंबा हा नाना काटे यांना धोक्याचा ठरू शकतो. किंबहुना तेच त्यांचा गेम करतील, अशी शक्यता आहे. तसेच लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी असल्याने सहानभुतीचा फायदा देखील अश्विनी जगताप यांना होऊ शकतो.
वरिष्ठ पत्रकार विश्वास मोरे यांनी विश्लेषण करताना सांगितले की, “यंदाची निवडणूक त्रिशंकू असल्याने काय होईल हे सांगता येणं तसं अवघड आहे. कारण माहविकास आघाडी आणि अपक्षाच्या मतांच्या विभाजनावर भाजपचं भवितव्य अवलंबून आहे. कारण मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात ३ ते ६ यावेळेत मतांचे डिव्हायडेशन होऊन जवळपास २१ टक्के मतदान झाले. त्यामुळे ज्या पक्षाने ही मतं फिरवली असतील त्याचा फायदा त्याला निश्चितपणे होणार आहे. मात्र अद्याप चित्र अनिश्चित आहे”.