५ क्विंटल कांद्याची विक्री करुन २ रुपये मिळाले

पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात राहणारे शेतकरी राजेंद्र तुकाराम चव्हाण यांनी ५१२ किलो कांद्याची विक्री केली. इतक्या कांद्याची विक्री करुन त्यांना केवळ २ रुपये देण्यात आले. सोलापूरमधील बाजारात आपला कांदा विक्रीसाठी आणताना त्यांनी ७० किलोमीटरचा प्रवास केला. पण त्याबदल्यात त्यांना केवळ २ रुपये मिळाले. हिवाळ्यातील मोसमात खरीपाचं पीक मोठ्या प्रमाणात आलं. त्यामुळे बाजारात कांदा विक्रीनंतर त्यांना केवळ एक रुपया किलो दर मिळाला. कांदा विक्रीनंतर त्यांना पोस्ट-डेटेड चेक देण्यात आला जो पंधरा दिवसांनी क्लिअर झाला.
कांद्याला अनुदान जाहीर करण्याची मागणी

महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेच्या नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारने तातडीने कांद्याला १५०० रुपये प्रति क्विंटल अनुदान जाहीर करावं. सध्या ३ रुपये, ४ रुपये आणि ५ रुपये किलोने विकला जाणारा कांदा १५ ते २० रुपये प्रतिकिलो दराने विकला जावा. या मागण्या पूर्ण न झाल्यास लासलगाव एपीएमसीमध्ये कांद्याचा लिलाव सुरू होऊ देणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या मुद्द्यावरुन अधिकारी यावर मार्ग काढण्यासाठी बैठक घेत असल्याचीही माहिती आहे.
कांद्याचा लिलाव बंद पाडला

सोमवारी आठवड्याच्या सुरुवातीला बाजार सुरू झाल्यानंतर लिलाव प्रक्रिया सुरू झाली. यात कांद्याची कमीत कमी किंमत २०० रुपये प्रति क्विंटल, तर अधिकाधिक भाव ८०० रुपये प्रति क्विंटल होता. तर सरासरी भाव ४०० ते ५०० इतका होता. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेच्या नेतृत्वाखाली संतप्त शेतकऱ्यांनी कांद्याचा लिलाव बंद पाडला आणि आंदोलन सुरू केलं.
शेतकऱ्यांच्या मागण्या

एका कांदा उत्पादकाने दिलेल्या माहितीनुसार, सरकारने कांद्याला तात्काळ १५०० रुपये प्रतिक्विंटल अनुदान जाहीर करावं. १५ ते २० रुपये किलोने कांदा खरेदी करण्याची मागणी त्यांनी केली. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास नाशिक जिल्ह्यातील लासलगाव एपीएमसीमध्ये लिलाव सुरू होऊ देणार नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
शेतकरी आर्थिक संकटात

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष आणि आमदार नान पटोले यांनी याबाबत बोलताना सांगितलं, की सरकारकडून शेतकऱ्यांच्या या प्रश्नांवर उत्तरं मागवली जातील. राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट असून कापूस, धान्य, मका, कांदा, सोयाबीन उत्पादक शेतकरी देशोधडीला लागला आहे. शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना कांदा रस्त्यावर फेकून द्यावा लागत आहे.