यावेळी बोलताना खासदार संजय राऊत पुढे म्हणाले, बाळासाहेबांनी प्रत्येकाच्या मनामनात शिवसेना रुजविली. वाघाची सेना त्यांनी जन्माला घातली. वाघाचे कातडे पांघरून काहीजण खऱ्या व निष्ठावंत शिवसैनिकांना भिडण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र त्यांना हे कदापी शक्य होणार नाही. कारण शिवसैनिक हे खरे वाघ आहेत. या वाघाबरोबर लढण्याचे धाडस गळ्यात घंटा बांधलेल्या कुत्र्यांना होणार नाही. आज संपूर्ण महाराष्ट्रतील माता- भगिनी आम्ही शिवसेनेबरोबरच आहोत असे उद्धव साहेबांना मनापासून सांगतात, मग पळून गेले त्यांची शिवसेना कोणती? हे जनतेला सांगण्याची गरज नाही. चाळीस आमदार गेले म्हणजे शिवसेना नव्हे, ते चोर म्हणजे शिवसेना नव्हे असा घणाघाती आरोप करत या चोरांचे काय करायचे? असा सवाल खासदार राऊत यांनी शिवसैनिकांना विचारत त्यांना कायमचे विसरण्यासाठी त्यांना या सभेच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहायची व त्यांच्या छाताडावर भगवा फडकवायचा हीच बाळासाहेबांना खरी आदरांजली ठरेल, असे सांगितले.
खासदार राऊत पुढे म्हणाले, पळून गेलेल्या चाळीस आमदारांमध्ये जवळपास १५ ते १६ आमदारांवर ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स विभागाच्या कारवाया सुरू होत्या. मात्र बीजेपीत गेल्यानंतर या कारवाया थांबविण्यात आल्या. ‘आपण यांना तुरुंगात टाकू, त्यांना तुरुंगात टाकू’ असा थयथयाट किरीट सोमय्या करत होते, मात्र ज्यांच्या नावाचा त्यांनी उल्लेख केला ती मंडळी बीजेपीत गेल्यानंतर त्यांचा हा त्रास कमी झाला. याचाच अर्थ तिकडे गेले की वाशिंग मशीनने साफ केले जाते असा मार्मिक टोला देखील खासदार राऊत यांनी भाजपला लगावला.
आमच्यावरही ईडीच्या धाडी पडल्या. या माध्यमातून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गेला. ‘पक्ष सोडा नाहीतर तुरुंगात जा’ अशी भीती दाखविण्यात आली. मात्र ‘मरण पत्करेन पण, भगवा सोडणार नाही’ असा खणखणीत इशारा त्यांना मी दिला. शंभर दिवसांपेक्षा जास्त काळ मी तुरुंगात राहिलो. मात्र आपला स्वाभिमान मी गहाण ठेवला नाही. बेइमानी केली नाही. हा स्वाभिमान प्रत्येक शिवसैनिकांच्या नसा नसात भिनला आहे. ज्या पक्षाने तुम्हाला पद, प्रतिष्ठा प्राप्त करून दिली त्याच पक्षाच्या पाठीत तुम्ही खंजीर खुपसता हे कदापिही तुम्हाला पचणार नाही. सच्चे शिवसैनिक हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. खोट्या कारवाया कदापिही हा शिवसैनिक सहन करणार नाही. प्रत्येक चोरीचा हिशोब द्यावाच लागेल. असे कितीही “मिंधे” आले तरी शिवसैनिक घाबरणारे नाहीत तर ते लढणारे आहेत हे त्यांनी लक्षात ठेवावे असा खणखणीत इशारा देखील खासदार राऊत यांनी यावेळी दिला.
सध्या ‘चाळीस चोरांनी’ विधिमंडळाचे ‘चोरमंडळ’ करून टाकले आहे. चोरमंडळ संबोधल्याने या महाभागांनी सभागृहाचे कामकाज बंद पडले. मोठा अकांड तांडव केला. मात्र कितीही आटापिटा केला तरी चोर ते चोरच असा जोरदार टोला खासदार राऊत यांनी लगावला. निवडणूक आयोगाने धनुष्यबाण व शिवसेना ही चाळीस गद्दारांची असा निर्णय दिल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली. आक्रोश, आकांत झाला. ‘मिंध्यां’नी गद्दारांच्या हातात सत्तेच्या चाव्या देण्याचे पाप केले. बाळासाहेबांचा आत्माच तुम्ही गद्दारांकडे सोपविला याची लाज तुम्हाला वाटली पाहिजे. मुंबईवर ताबा मिळवून येथील मराठी माणसाला कंगाल करण्याचे षडयंत्र या बीजेपीने रचला आहे. शिवसेनेच्या शेपटीवर पाय ठेवताय हे लक्षात ठेवा. जखमी वाघ हा भयंकर असतो त्यामुळे हा शिवसेनेचा वाघ तुमच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असा इशारा देखील खासदार राऊत यांनी विरोधकांना दिला. पाठीत खंजीर खुपसला म्हणून शिवसेना संपणार नाही. बाळासाहेबांनी शिवसैनिकांना रडायला नाही तर लढायला शिकवले आहे हे त्यांनी लक्षात ठेवावे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राज्यातील जनतेतून मोठी सहानुभूती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्याकडे राज्याचे नेतृत्व द्यावयाचे आहे. कोल्हापूरच्या भूमीतून दिलेला हा संदेश संपूर्ण महाराष्ट्रभर जातो हा आजपर्यंतचा इतिहास आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी एकनिष्ठतेची ही वज्रमूठ कायम ठेवावी असे आवाहन खासदार राऊत यांनी शेवटी केले.
५० खोके देता, मग महागाई का कमी नाही?
सध्या देशातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यांची आज अवस्था वाईट झाली आहे. भरमसाठ महागाई वाढल्याने जनता भरडली आहे. असे सांगून ५० खोके देण्यासाठी तुमच्याकडे पैसा आहे मग महागाई का कमी होत नाही? असा रोखठोक सवाल खासदार राऊत यांनी भाजपला केला.
…..तरच वसंत फुलतो
झाडावरची जुनी पाने गळाल्याशिवाय नवीन वसंत फुलत नाही. असा टोला विरोधकांना लगावत आता वसंत फुलतोय, नवीन फुले-फळे येत आहेत हे शिवसैनिकांनी दाखवून दिले आहे असे सांगून विरोधकांना खासदार राऊत यांनी चपराक दिली.
हिम्मत असेल तर अदानीला नोटीस पाठवा
केवळ द्वेषापोटी व सुड उगवण्यासाठी धाडी टाकून दबाव तंत्राचा वापर करणाऱ्या भाजप सरकारने हिम्मत असेल तर अदानीना नोटीस पाठवावी, असे सांगतानाच एसबीआय, एलआयसी, पंजाब नॅशनल बँक प्रकरणांची का चौकशी लावली जात नाही? असा सवाल करत खासदार राऊत यांनी भाजपचा खरा चेहरा उघड केला.
यावेळी कोल्हापूर जिल्हा शिवसेनाप्रमुख विजय देवणे, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, माजी आमदार संजयबाबा घाटगे आदींची भाषणे झाली. शिवसेनेच्या वतीने खासदार संजय राऊत यांचा सत्कार करण्यात आला.