सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण आणि सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली हवालदार घुगे यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. भगवान गोरपेकर आणि दीपक अशी हल्लेखोर दुचाकीस्वारांची नावे आहेत.
हवालदार घुगे मंगळवारी कल्याण-शिळ महामार्गावरील लोढा जंक्शन येथे वाहतूक सुरळीत करण्याचे काम करत होते.संध्याकाळी ७.३० च्या वाजेच्या सुमारास तेथून आरोपी भरधाव वेगाने दुचाकीवरुन जात होते. हवालदार घुगे यांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला. मात्र, आरोपींनी शिवीगाळ करून ते पुढे जाऊन थांबले. त्यांनी हवालदार घुगे यांना शिवीगाळ आणि बाचाबाची करत बेदम मारहाण केली.
आरोपी भगवान गोरपेकर याने हात तसेच हाताचे बोटे मुरगळली. तसेच डोळ्यावर मारलं आणि त्याचा साथीदार आरोपी दिपक याने हवालदार गुघे यांना हाता बुक्याने मारहाण करुन खाली पाडण्याचा प्रयत्न केला. सदर झालेल्या झटापटीत त्यांनी शर्टाचे वरील तीन बटणे तसेच सरकारी नेम प्लेट व डाव्या हाताच्या खांद्यावरील फित खेचून फाडली आणि आरोपी तेथून पळून गेले.
दरम्यान कर्तव्य बजावत असताना सरकारी कामात अडथळा आणून बलप्रयोग करुन तसेच मारहाण करुन शिवीगाळ केली म्हणून त्या दोघांविरोधात कायदेशीर तक्रार मानपाडा पोलीस ठाण्यात हवालदार घुगे यांनी केली आहे. मानपाडा पोलिसांनी त्या दोघांविरोधात १६५/२०२३ भादंवि कलम ३५३, ३३२, ३२३, ५०४, १८६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पोलीस या प्रकरणी हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.