जळगाव : जळगाव तालुक्यातील खेडी खुर्द येथील तरूणाचा छतावरून खाली पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी ७ वाजता उघडकीला आली. अंकुश ज्ञानेश्वर चौधरी (वय-२५ वर्ष, रा. खेडी खुर्द ता. जि. जळगाव) असे मयत तरूणाचे नाव आहे.

अंकुश याला सकाळी आजी उठवण्यासाठी गेली असता, हा प्रकार समोर आला आहे. गच्चीला कठडे नसल्याने झोपेच्या धुंदीत शौचालयाला जात असतांना अंकुश खाली पडल्याचे सांगितले जात आहे. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव तालुक्यातील खेडी खुर्द गावात अंकुश चौधरी हा आई, वडील, भाऊ यांच्यासोबत वास्तव्याला होता. अंकुशचे वडील आजारी असतात. त्यामुळे अंकुश हाच शेतीचे सर्व कामे करतो, नेहमीप्रमाणे मंगळवारी रात्री शेतीची कामे आटोपून अंकुश हा घरी आला, त्यानंतर जेवण करून घराच्या गच्चीवर झोपायला गेला.

शेतात सध्या गहू हरभरा काढण्याची लगबग सुरु आहे, त्यामुळे शेतीची अनेक कामे होती, त्यासाठी लवकर लवकरात कामे व्हावीत, यासाठी अंकुशची आजी गोपाबाई विठ्ठल चौधरी ह्या बुधवारी सकाळी ६ वाजता गच्चीवर झोपलेल्या नातू अंकुश याला उठविण्यासाठी गेल्या.

यादरम्यान गच्चीच्या खाली रक्ताबंबाळ अवस्थेत अंकुश हा पडलेला दिसून आला. नातवाचा मृतदेह पाहून आजीने आरडाओरड करत हंबरडा फोडला. ते ऐकून कुटुंबियांनीही गच्चीकडे धाव घेतली, अंकुशला पाहून त्यांनी आक्रोश केला. अंकुश हा गच्चीवर झोपला होता, मध्यरात्री शौचालयास जाण्यासाठी उठला असता, झोपेच्या धुंदीत कठडे नसल्याने गच्चीवर तो खाली पडला व त्याचा मृत्यू झाला अशी माहिती देण्यात आली आहे.

बैलांना पाणी पाजताना पाय घसरला, मामाकडे शिकणाऱ्या भाच्याचा कालव्यात बुडून मृत्यू
बाजार समितीचे सभापती कैलास चौधरी यांनयी घटनेची माहिती तालुका पोलीस ठाण्यात कळविली, त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करुन मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. या प्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

जन्मानंतर बाळाने डोळे मिटले, दुसऱ्याच दिवशी आईचाही मृत्यू, गावात एकाही घरात चूल पेटली नाही
मयत अंकुशच्या पश्चात आई सुनिता, भाऊ भावेश, वडील ज्ञानेश्वर विठ्ठल चौधरी, आजी गोपाबाई असा परिवार आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विश्वनाथ गायकवाड करीत आहे. वडील आजारी, तसेच कुटुंबांची जबाबदारी सांभाळणाऱ्या कर्त्या मुलाचा दुर्दैवी घटनेत मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्‍त केली जात आहे

गरज माणसाला काय करायला लावेल? कर्ज फेडण्यासाठी चक्क रस्त्याच्या बांधकामाचा जेसीबीच चोरला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here