पुणे : पुण्यातील कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपला बालेकिल्ला गमावावा लागला आहे. काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी भाजपच्या हेमंत रासने यांना पराभूत केलं आहे. हेमंत रासने यांनी देखील पराभवाचं आत्मचिंतन करणार असल्याचं म्हटलं आहे. भाजपला बालेकिल्ल्याला रवींद्र धंगेकर यांनी सुरुंग लावला आहे. भाजपकडून मोठी ताकद मैदानात लावली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे बडे नेते मैदानात उतरले होते. मात्र, रवींद्र धंगेकर यांच्या विजयाद्वारे काँग्रेसनं पुन्हा एकदा पुण्यातील ताकद दाखवून दिली आहे. राज्यातील सत्तांतरानंतर झालेल्या पहिल्या चुरशीच्या निवडणुकीत काँग्रेसनं विजय मिळवला. धंगेकरांचा जनसंपर्क, गिरीश बापट यांच्यावर आजारामुळं आलेल्या मर्यादा, ब्राह्मण मतदारांची नाराजी, ठाकरेंना मानणारे शिवसैनिक सोबत नसणं, टिळक कुटुंबात उमेदवारी नसल्यानं सहानुभूती निर्माण करण्यात आलेलं अपयश अशी काही प्रमुख कार असल्याचं म्हटलं जातंय.

धंगेकरांचा जनसंपर्क, रासनेंचा जनसंपर्क कमी

रवींद्र धंगेकर यांनी या निवडणुकीत ११ हजार ४० मतांनी विजय मिळवला. रवींद्र धंगेकर यांना ७३ हजार १९४ तर भाजपच्या ६२ हजार २४४ मतं मिळाली. रवींद्र धंगेकर यांनी माध्यमांशी बोलताना एक गोष्ट सांगितली ते म्हणजे ते फक्त दुचाकीवरुन प्रवास करतात. त्यामुळं जनतेशी संवाद साधण्यात त्यांना अडचण राहत नाही. करोना काळात रवींद्र धंगेकर यांनी जात पात धर्म विसरुन मदतीचं काम केलं. दुसरीकडे हेमंत रासने यांचा जनसंपर्क कमी होता. तर, मुक्ता टिळक आमदार असताना आजारी असल्यानं त्यांच्यावर मर्यादा आल्या होत्या. कसब्यातील मतदारांनी देखील रवींद्र धंगेकर अनेक प्रश्न सोडवण्यासाठी मदतीला येत असल्याचं सांगितलं होतं.

गिरीश बापटांचा हवा तसा फायदा भाजपला झाला नाही

गिरीश बापट यांचा कसबा पेठ मतदारसंघ बालेकिल्ला मानला जातो. कसब्यात गिरीश बापट यांची स्वतंत्र यंत्रणा कार्यरत असायची. मात्र, गिरीश बापट यांच्यावर आजारपणामुळं आलेल्या मर्यादांमुळं भाजपला त्यांचा पुरेसा लाभ झाला नाही. गिरीश बापट यांनी एका मेळाव्याला उपस्थिती लावली होती. मात्र, त्यावरुन देखील भाजपला टीकेला सामोरं जावं लागलं. गिरीश बापट सक्रीय नसल्यानं त्यांची यंत्रणा देखील यावेळी सतर्क झालेली दिसली नाही.

ब्राह्मण मतदारांची नाराजी

कसबा पेठ निवडणुकीत भाजपला ब्राह्मण मतदारांच्या नाराजीला सामोरं जावं लागलं. कोथरुडमध्ये मेधा कुलकर्णींच्या जागेवर चंद्रकांत पाटील यांना २०१९ मध्ये मिळालेली उमेदवारी, मेधा कुलकर्णींचं न झालेलं पुर्नवसन, देवेंद्र फडणवीस यांना स्वीकारावं लागलेलं उपमुख्यमंत्रीपद आणि मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर टिळक कुटुंबाऐवजी ऐवजी हेमंत रासने यांना दिलेली उमेदवारी यामुळं पुण्यातील ब्राह्मण मतदारांमध्ये नाराजी होती. याचा फटका देखील भाजपला बसला.

Kasba Result: कसबा पोटनिवडणुकीत पहिल्या फेरीत अभिजित बिचुकले आणि आनंद दवेंना किती मतं पडली?

ठाकरेंना मानणारे शिवसैनिक सोबत नसणं

कसबा पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरु असताना निवडणूक आयोगानं शिवसेना पक्ष आणि चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले. त्यामुळं उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या शिवसैनिकांमध्ये संतापाचं वातावरण होतं. कसबा पेठेत एकनाथ शिंदे यांना मानणाऱ्या शिवसैनिकांची संख्या फारच कमी होती. आदित्य ठाकरे यांनी रवींद्र धंगेकर यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. उद्धव ठाकरे यांनी देखील ऑनलाईन सभा घेतली. आदित्य ठाकरेंची प्रचार सभा काँग्रेससाठी फायदेशीर ठरली. सचिन अहिर यांनी पुण्यात तळ ठोकलेल होता. पुण्यातील ठाकरे समर्थक शिवसैनिक संजय मोरे देखील पूर्ण ताकदीनं मैदानात उतरले होते. त्यामुळं एकनाथ शिंदे यांचा रोड शो होऊन देखील कसब्यात भाजपला पराभवाचा धक्का बसला.

मतमोजणीच्या फेऱ्या पार पडत राहिल्या, धंगेकरांची आघाडी वाढत गेली, हेमंत रासने मठात ध्यानस्थ बसून राहिले

मुक्ता टिळकांविषयी सहानुभूती निर्माण करण्यात अपयश

मुक्ता टिळक कसबा पेठ मतदारसंघातून २०१९ मध्ये विजयी झाल्या होत्या. मात्र, करोना संसर्गाच्या काळात आजारपणामुळं मुक्ता टिळक यांच्या कामकाजावर मर्यादा आल्या होत्या. आजारी असताना देखील मुक्ता टिळक दोन वेळा मुंबईला विधानपरिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीत मतदानाला उपस्थित राहिल्या होत्या. मात्र, त्यांच्या निधनानंतर भाजपनं टिळक कुटुंबातील उमेदवार न देत भाकरी बदलण्याचा प्रयत्न केला. टिळक कुटुंबानं देखील सुरुवातीला यासंदर्भात नाराजी व्यक्त केली होती. टिळक कुटुंबातील उमेदवार नसल्यानं सहानुभूती निर्माण करण्यात अपयश आल्याचं या निमित्तानं दिसून येतं आहे.

घासून नाय, ठासून आले… भाजपचा बालेकिल्ला हिसकावला, रविंद्र धंगेकरांनी गुलाल उधळला!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here