सेबीने अर्शद वारसीसह त्याची पत्नी मारिया आणि त्याचा भाऊ इक्बाल वारसी यांच्यावर कारवाई केली. त्यांना एक वर्षाच्या कालावधीसाठी बाजारातील क्रियाकलापांमध्ये भाग घेण्यापासून बंदी घालण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी सेबीने साधना ब्रॉडकास्ट लिमिटेडच्या प्रवर्तकांसह ३१ संस्थांवर कारवाई केली आहे. सेबीच्या कारवाईच्या कक्षेत आलेल्या सर्व लोक आणि युनिट्सना ४१ लाख ८५ हजारांचा नफा झाला असून बाजार नियामकने संपूर्ण नफा जप्त करण्याचे निर्देश दिले. या प्रकरणात अर्शद वारसीला २९.४३ लाख रुपये तर त्यांच्या पत्नीला ३७.५६ लाखांचा नफा झाल्याचे सेबीने सांगितले.
लक्षात घ्या की सेबी बऱ्याच काळापासून युट्युब इन्फ्लुएन्सर्सवर आळा घालण्याची तयारी करत होती. याप्रकरणी दोन वर्षांपूर्वी नियम बनविण्याची कसरत सुरू झाली होती. सेबीने म्हटले की या प्रकरणात दोषी आढळलेल्या अर्शद वारसीसह अनेक यूट्यूबर्स गुंतवणूकदारांची दिशाभूल करून त्यांचे व्हॉल्युम वाढवत होते आणि दरमहा ७५ लाख रुपयांची कामे करत होते. सर्व दोषींवर कारवाई करत सेबीने ताबडतोब बाजारातील व्यापारावर बंदी घातली आहे.
मार्केट पंप आणि डंप प्रकरण काय आहे?
स्टॉक मार्केटमध्ये पंप आणि डंप म्हणजे एखाद्या अफवेद्वारे लोकांना कंपनीच्या शेअर्सकडे आकर्षित करणे. जेव्हा अधिकाधिक लोक शेअर्स खरेदी करतील आणि व्हॉल्यूम तयार होईल. म्हणजे जेव्हा शेअरचा भाव वाढत तेव्हा अफवा पसरवणारे लोक आपले शेअर्स विकून निघून जातात. सेबीने आता ज्या प्रकरणांमध्ये कारवाई केली आहे त्या बाबतीतही असेच घडले आहे. साधना ब्रॉडकास्ट आणि शार्पलाइनच्या शेअर्समध्ये व्हॉल्यूम तयार करण्यासाठी युट्युब चॅनेलचा वापर करण्यात आला.
जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर लक्षात घ्या की शेअर्सच्या पंप आणि डंप योजनेला आर्थिक फसवणुकीच्या श्रेणीत ठेवण्यात आले असून यामध्ये ट्रेड होणाऱ्या एखाद्या स्टॉकला वाढवण्याचा किंवा पाडण्याची रणनीती अवलंबली जाते. युट्युब इन्फ्लुएन्सर्स आपल्या चॅनेलद्वारे ॲसेटचा प्रचार करतात आणि जेव्हा ती नफ्याच्या पातळीवर पोहोचते तेव्हा त्याची विक्री सुरू करतात. शेअरची किंमत कमी करून तो स्टॉक खरेदी करण्यासाठी देखील अशीच युक्ती अवलंबली जाते.