पालघर जिल्ह्यातील तलासरी पोलीस ठाणे हद्दीतील एक १० वर्षीय अल्पवयीन मुलगी बुधवारी सकाळी ९ वाजता नेहमीप्रमाणे आपल्या शाळेत गेली. परंतु ती शाळेतून पुन्हा घरी न परतल्याने तिच्या कुटुंबीयांनी आजूबाजूच्या परिसरात व नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र, तरीही ती न सापडल्याने कुटुंबीयांनी तलासरी पोलीस ठाणे गाठत मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत मुलीचा शोध घेण्यासाठी तलासरी पोलिसांकडून पथके रवाना करण्यात आली. कोणतेही धागेदोरे नसताना तांत्रिक पुराव्यांच्या आधारे मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीचा शोध घेत पोलिसांनी अवघ्या काही तासात त्याला ताब्यात घेतलं.
आरोपी नराधम रमेश दुबळा पिडीत मुलीच्या घराशेजारी राहणारा असून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून दुचाकीवरुन गुजरात राज्यात घेऊन गेला. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करून गळा दाबून तिची हत्या केल्याचं आरोपीने पोलिसांसमोर कबूल केले. आरोपीचे मुलीच्या कुटुंबाशी घरगुती व आर्थिक देवाणघेवाणीतून वाद झाले होते. याचाच राग मनात धरून त्याने हे कृत्य केल्याचं समोर आलं आहे. आरोपी नरेश दुबळा याला तलासरी पोलिसांनी अटक केली असून भादंवि कलम ३०२, ३७६ पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक पंकज शिरसाठ यांच्या आदेशाने उपविभागीय पोलीस अधिकारी डहाणू विभाग संजीव पिंपळ यांच्या मार्गदर्शनाखाली तलासरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय वसावे, सापोनी. भरत पाटील, पोउपनि. उमेश रोठे, मपोउपनि. रिजवाना ककेरी, पोउपनि. समीर लोंढे, भाऊ गायकवा, हर्षद शेख व तलासरी पोलीस ठाण्यातील अंमलदार यांनी या नराधम आरोपीला अटक करण्याची कामगिरी केली आहे.