पुणे :नाना काटे यांच्या रुपात अजित पवार यांनी मोठा डाव खेळला. २०१७ नंतर पिंपरी चिंचवडवरचं गमावलेलं अस्तित्व मिळविण्यासाठी अजित पवारांनी रात्रीचा दिवस केला. कित्येक बैठक घेतल्या, कार्यकर्त्यांना कामाला लावलं. आपल्या विश्वासू आमदाराकडे इथली प्रभारीपदाची जबाबदारी दिली. पण शेवटी जनता जनार्दनापुढे कुणाचंच काही चालत नाही म्हणतात तेच खरं. जी बारामती अजितदादांना दीड-दीड लाख मतांनी निवडून देते, त्याच अजितदादांच्या नेतृत्वाखालील उमेदवार नाना काटेंना चिंचवडकरांनी नाकारलं. भलेही अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यामुळे मतविभागणी होऊन त्याचा फायदा भाजपच्या अश्विनी जगताप यांना झाला पण सरतेशेवटी राष्ट्रवादीच्या वाट्याला इथे पराभव आला आणि चिंचवडमध्ये पुन्हा एन्ट्री करण्याचं अजितदादांचं स्वप्न भंगलं.

सुरुवातीला राहुल कलाटे यांच्या नावावर राष्ट्रवादी आणि शिवसेनेत एकमत झालं होतं. खासदार संजय राऊत यांनी चिंचवडच्या जागेवर दावा केल्याने अजित पवार यांनी प्लॅन केला आणि सूत्रे फिरवली. कलाटे राष्ट्रवादीतून लढतील, अशी शक्यता निर्माण केली. अजितदादांनी कलाटेंच्या नावावर शिवसेनेकडून ही जागा राष्ट्रवादीकडे घेतली आणि ऐनवेळी राहुल कलाटे यांच्याऐवजी आपले मर्जीतले नेते नाना काटे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आणि चिंचवडची सगळी सूत्रं आपले खास आणि विश्वासू आमदार सुनील अण्णा शेळके यांच्याकडे सोपवली. नाना काटे जरी निवडणुकीच्या रिंगणात असले तरी त्यावर आपला होल्ड कसा राहिल, याची पुरेपूर काळजी अजित पवार यांनी घेतली.

उमेदवार निश्चितीपासून संपूर्ण प्रचारयंत्रणेवर अजितदादा लक्ष ठेऊन होते. निवडणूक काळात तर अजितदादांनी चिंचवडमध्ये ठाण मांडलं. सगळे नगरसेवक-पदाधिकारी-कार्यकर्ते कामाला लावले. काहीही करुन काटेंना निवडून आणायचं, असा निर्धारच अजित पवार यांनी केला होता. कारण काटेंच्या विजयाने अजित पवार यांना चिंचवडमध्ये पुन्हा एन्ट्री करुन नव्या कारकीर्दीची सुरुवात करायची होती.

एक काळ होता जेव्हा अजित पवार यांनी याच मतदारसंघातून निवडून येऊन संसेदत पाऊल ठेवलं होतं. १९९१ ला तरुण तडफदार अजितदादांना पिंपरी चिंचवडकरांनी भरघोस मतांनी निवडून दिलं होतं. पुढे त्यांनी विधिमंडळात एन्ट्री केली खरी पण त्यांचं पिंपरी चिंचवडवरचं प्रेम काही कमी झालं नाही. पिंपरी चिंचवडच्या गावठाणातील अनेक स्थानिक तरुण नेतृत्वाला त्यांनी नगरसेवक-स्थायी समिती-आमदारकीची संधी दिली. पक्षात अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या. त्यामाध्यमातून शेकडो कोटींचा विकासनिधी दिली. अजितदादांचं बारामतीनंतरचं दुसर घर म्हणून पिंपरी चिंचवडकडे पाहिलं जाऊ लागलं. शहरात अजित पवार यांच्या परवानगीशिवाय पानही हलत नाही, अशी स्थिती निर्माण झाली. १५ वर्षे पिंपरी पालिका अजित पवारांच्या हातात होती. ते म्हणतील तसंच शहरात घडत होतं. याच काळात शहराचा मोठा कायापालट झाला. परंतु २०१७ साली अजित पवार यांच्या कारभाराला दृष्ट लागली.

घासून नाय, ठासून आले… भाजपचा बालेकिल्ला हिसकावला, रविंद्र धंगेकरांनी गुलाल उधळला!
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात २०१४ साली देशात परिवर्तन झालं, तोच कित्ता महाराष्ट्रातही फडणवीसांनी गिरवला. आघाडी सरकार उलथवून लावत भाजप-सेना युतीचं सरकार सत्तेत आणलं. कामाचं सरकार अशी पहिल्या दोन-तीन वर्षात इमेज तयार केली. साहजिक २०१७ च्या महापालिका निवडणुकीत फडणवीसांनी आक्रमकपणे प्रचार करुन अजितदादांच्या १५ वर्षातील सत्ताकाळाला टार्गेट करुन शेकडो कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले. दरम्यानच्या काळात भाजप सरकार सत्तेत आल्याने अजितदादांचे विश्वासू शिलेदार एक एक करुन (लांडगे-जगताप) फडणवीसांच्या गोटात दाखल झाले. एकंदर अजितदादा चक्रव्यूहात अडकले अन् १५ वर्षांपासून सत्तेत असलेली महापालिका अजितदादांच्या हातातून निसटली.

नाना काटेंच्या विजयाने अजितदादांचा पुन्हा दणक्यात एन्ट्रीचा प्लॅन; पण कलाटेंमुळे डाव उलटणार?
पुढच्या २ वर्षात पुन्हा अजित पवार यांनी त्यांचा मुलगा पार्थ पवार यांना लोकसभेच्या रणांगणात उतरवून चिंचवडमध्ये एन्ट्री करण्याचा प्रयत्न केला. पण तोही प्रयत्न पिंपरी चिंचवडवासियांनी हाणून पाडला. आता नाना काटे यांना निवडून आणून त्यांच्यासोबतच दादांचंही नवं पर्व सुरु होईल, अशी शक्यता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते-पदाधिकारी बोलून दाखवत होते. पण यावेळी अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी बंडखोरी करत अजितदादांच्या स्वप्नांना सुरुंग लावला.

राहुल कलाटे यांनी जवळपास २९ हजार मतं घेतली. कलाटे यांच्यामुळे मोठं मतविभाजन होऊन त्याचा फायदा अश्विनी जगताप यांना झाला. जर कलाटेंनी बंडखोरी केली नसती तर थेट जगताप विरुद्ध काटे अशी लढत झाली असती आणि मतविभाजनही टळलं असतं. परंतु कलाटेंनी दादांचं म्हणणं काही ऐकलं नाही. शेवटी अजितदादांच्या प्रयत्नाला अपयश आलं.

अजितदादांना अपयश, प्रयत्नांची शर्थ करुनही चिंचवडची जागा जाण्याची शक्यता, EXIT POLL आला
मागील ५ वर्षे पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका भाजपच्या ताब्यात होत्या. सध्या महापालिकेची मुदत संपल्याने पुढच्या काहीच महिन्यात तेथील निवडणुका होणार आहेत. त्या दृष्टीने चिंचवडची जागा अजितदादांसाठी खूपच महत्त्वाची होती. पिंपरी चिंचवडकरांनी नाकारल्याची सल अजित दादांच्या मनात गेली ५ वर्षे आहे. आता यानिमित्ताने चिंचवडकर आपल्या उमेदवाराला स्वीकारतील आणि त्याचा फायदा आपल्याला महापालिका निवडणुकीत होईल, अशी आशा अजित पवार यांना होती. त्यानिमित्ताने संपूर्ण पक्षही शहराचं नेतृत्व पुन्हा दादांकडे सोपाविण्यास उत्सुक होता. परंतु दादांची ती आशाही धुळीस मिळाली आहे. एकंदरित चिंचवडचा निकाल हा अजितदादांसाठी फार मोठा धक्का असल्याचं बोललं जातंय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here