पुणे : ‘उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचे महाविकास आघाडीचे सरकार भारतीय जनता पक्षाने कुरघोड्या करून पायउतार केले. त्याचा राग जनतेमध्ये होता. तो मतदानाच्या रुपातून व्यक्त झाला असून, ही महाविकास आघाडीच्या विजयाची नांदी आहे. येत्या महापालिका निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देतील,’ असा विश्वास कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केला. ‘कसब्यात झालेल्या पैशांच्या धुरात भाजप-शिंदे सरकार जळून खाक झाले,’ असा टोलाही त्यांनी लगावला.
पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर धंगेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस भवनात पत्रकार परिषद घेतली. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख गजानन थरकुडे व संजय मोरे या वेळी उपस्थित होते. कसबा पोटनिवडणूक निकालानंतर काँग्रेस नेते आशीष देशमुखांचा मोठा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ ‘शरद पवार, अजित पवार, आदित्य ठाकरे यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या सर्व नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी माझ्या विजयाचा मार्ग सुकर केला,’ अशी कृतज्ञता व्यक्त करत धंगेकर यांनी भाजप-शिंदे सरकारवर सडकून टीका केली. ‘गेल्या पंधरा दिवसांपासून पुण्यात पैशांचा पाऊस पाडला गेला. अत्यंत चुकीच्या पद्धतीने ही पोटनिवडणूक हाताळली गेली व पैशांचे राजकारण केले गेले. त्यामुळे भविष्यात भाजपचा सर्वसामान्य कार्यकर्ता उमेदवार म्हणून उभा राहिल्यास त्याच्यापुढे मोठे संकट निर्माण होणार आहे. ही निवडणूक हुकुमशाहीकडे नेण्याचे काम मुख्यमंत्री व भाजपच्या नेत्यांनी केले. त्याविरोधात मी कसबा गणपती मंदिरासमोर उपोषण केले. जनतेच्या दरबारात मला न्याय मिळाला,’ असेही ते म्हणाले.
पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘हू इज धंगेकर’ असा अवमानास्पद प्रश्न करत धंगेकर यांना अनुल्लेखाने मारण्याचा प्रयत्न केला. त्याबाबत विचारणा केली असता, ‘मी रवींद्र धंगेकर’ असे खोचक पुणेरी उत्तर धंगेकर यांनी दिले.