निवडणुकीच्या मतमोजणीत अश्विनी जगताप यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली. आणि शेवटपर्यंत ही आघाडी कायम ठेवली. मतमोजणीच्या २० ते २२ व्या फेरीतच त्यांनी नाना काटेंना मोठ्या फरकाने मागे टाकलं आणि विजयी आघाडी मिळवली होती. पिंपळे गुरव आणि सांगवी येथील मतपेट्या मतमोजणीसाठी उघडण्यापूर्वीच अश्विनी जगताप या विजयी होणार हे जवळपास स्पष्ट झाले होते. विशेष म्हणजे नाना काटे आणि राहुल कलाटे यांचे वर्चस्व असतानाही अश्विनी जगताप यांनी आघाडी घेतली. रावेत, मामुर्डी, किवाळे, वाकड, थेरगाव, रहाटणी आणि कालाटेवाडीत जगताप यांनी लक्षणीय आघाडी घेतली होती. पिंपळे सौदागर, कलाटेवाडी आणि वाकड या ठिकाणाहून अश्विनी ताईंना मोठं मतदान झाल्याचं भाजप नेत्यानं सांगितलं.
सुरवातीपासूनच राहुल कलाटे हे मतमोजणीत मागे होते. पण फेरीनुसार ते जी मतं मिळवत गेले त्यावरून निवडणुकीत कोण विजयी होणार? हे निश्चित होत गेलं. कलाटे यांना निवडणुकीत ४५ हजारांहून अधिक मतं मिळाली. कलाटे आणि काटे या दोघांच्या मतांची बेरीज केल्यास मतांची ही संख्या भाजपच्या विजयी उमेदवार अश्विनी जगताप यांच्या मतांपेक्षा अधिक होते.
राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांच्या समर्थनात उमेदवारी मागे घ्यावी, असं आवाहन अजित पवारांनी राहुल कलाटे यांना केलं होतं. एवढचं नव्हे तर उद्धव ठाकरे यांनीही कलाटे यांना माघार घेण्यास सांगितलं होतं. त्यानंतर राहुल कलाटे यांनी बंडखोरी केली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कलाटे यांनी १.१२ लाख मतं मिळवली होती. त्यामुळे महाविकास आघाडीने आपल्याला उमेदवारी द्यावी, अशी मागणी राहुल कलाटे यांनी केली होती. आपण निवडणुकीत आधीच स्वतःला सिद्ध केलं असताना आपल्या जागी दुसऱ्याला उमेदवारी का? असा सवाल कलाटे यांनी केला होता.
महाविकास आघाडीने नाकारल्यामुळे राहुल कालाटे यांच्या मनात रोष होता. महाविका आघाडीने नाकारल्याने कलाटे यांच्या मनात कुठेतरी सल होती. तसंच महाविकास आघाडीची मतं फोडण्यासाठी भाजपनेच कलाटे यांना उभे केल्याची चर्चाही रंगली. ही भाजपची रणनीती असल्याची शक्यताही व्यक्त केली. यामुळे राहुल कलाटेंच्या अपक्ष निवडणूक लढण्याचा फायदा अश्विनी जगताप यांना झाला. आणि नाना काटे यांचे मताधिक्य घटले. यामुळेच निवडणुकीतील विजयानंतर अश्विनी जगताप यांनी जाहिरपणे कलाटेंचं नाव घेत प्रतिक्रिया दिली आहे. कलाटेंमुळे आपल्याला फायदा झाल्याचं अश्विन जगताप यांनी स्पष्टपणे सांगितलं.