म. टा. वृत्तसेवा, कल्याण: कल्याणहून टिटवाळ्याकडे जाणाऱ्या लोकलच्या मालडब्यातून प्रवास करणाऱ्या बबन हांडे देशमुख या ज्येष्ठ नागरिकाची चालत्या लोकलमध्ये हत्या केल्याची घटना गुरुवारी कल्याण-आंबिवली स्थानकांदरम्यान घडली. याप्रकरणी एका संशयिताला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.आंबिवली येथे राहणारे बबन देशमुख (६५) सेवानिवृत्त असून कल्याण येथे कामानिमित्त आले होते. संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ते काम आटोपून लोकलने घरी निघाले होते. लोकलच्या टिटवाळा बाजूकडील मालडब्यातून प्रवास करत असलेल्या बबन यांचा सहप्रवाशाशी वाद झाला. यातून या सहप्रवाशाने त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्यांचा जागीच मृत्यू झाला. डब्यातून प्रवास करणाऱ्या इतर सहप्रवाशांनी याची माहिती आंबिवली स्थानकात कर्तव्यावर असलेल्या आरपीएफ कर्मचाऱ्यांना दिल्यानंतर रेल्वे पोलिसांनी तातडीने धाव घेत पाहणी केली. याप्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले.