भारतीय जनता पक्षाच्या राज्यातील सर्व शहर, जिल्हा संघटनांमध्ये तातडीने बदल करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या महिनाअखेरीस शहर भाजपमध्येही मोठ्या प्रमाणात बदल करण्याचे संकेत आहेत. कसबा पेठ पोटनिवडणुकीतील पराभवामुळे पुणे शहरातील बदलांना महत्त्व प्राप्त झाल्याचा गौप्यस्फोट भाजपमधील एका ज्येष्ठ नेत्याने केला आहे.
केंद्रीय नेतृत्वाकडून महिनाअखेरीस राज्यातील भाजप संघटनेमध्ये बदल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुणे शहर संघटनेचेही मुदत संपल्याने बदल करण्यात येणार आहेत. कसबा पेठ पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवाची कारणमीमांसा करणारा अहवाल राज्यातील नेतृत्वाने तयार करण्याच्या सूचना काही घटकांना दिल्या आहेत. हा अहवाल तयार करताना ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, विधान परिषदेतील भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड आदींच्या प्रतिक्रियाही नोंदविण्यात येणार असल्याचे समजते.
कसबा पेठ निवडणुकीत झालेल्या चुका, धोरणात्मक निर्णय, संघटनेतील अंतर्गत वाद, अशा अनेक घटकांचा उहापोह या अहवालात करण्यात येणार आहे. त्यानुसार कसब्यात मदत न करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांचीही विशेष ‘दखल’ घेतली जाणार असल्याचे समजते. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (आरएसएस) समन्वय गेल्या काही वर्षांत तुलनेने चांगला राहिला नसल्याच्या तक्रारी या निवडणुकीच्या निमित्ताने झाल्या आहेत. त्यामध्येही सुसूत्रता आणण्यात येणार असल्याचे समजते.